शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Sharad Pawar : शरद पवार यांनी गोरगरिबांची रयत शिक्षण संस्था लुटली आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावाने संस्था करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने केलाय.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम (EVM) मशीनवर आरोप केला जात आहे. तर सोलापूरच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी (Markadwadi) या गावाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने दबाब टाकत अभिरुप मतदानाचा प्रयोग बंद पाडला. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मारकडवाडीत जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले असा आरोप देखील त्यांनी केलाय.
महेश शिंदे म्हणाले की, शरद पवार यांनी गोरगरिबांची रयत शिक्षण संस्था लुटली आणि मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावाने संस्था करण्याचा प्रयत्न केला. रयत शिक्षण संस्थेची घटना बदलून हजार कोटी रुपये शरद पवार यांनी परस्पर मुलगी सुप्रिया सुळे यांच्या नावाने वळते केले. त्यामुळे आता त्यांना विनंती आहे की, महाराष्ट्राने त्यांना जे मँडेट दिले आहे ते त्यांनी स्वीकारावे. आता महाराष्ट्र मुलीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सोडून द्या, असा हल्लाबोल त्यांनी शरद पवार यांच्यावर केलाय. आता महेश शिंदे यांच्या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गट काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता चांगलं मंत्रिपद मिळावे : महेश शिंदे
तर, महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजून महायुतीत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. महेश शिंदे यांना मंत्रिपदाबाबत विचारले असता माझ्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळ आहे. आता चांगलं मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
मारकडवाडीतून काय म्हणाले शरद पवार?
दरम्यान, आज शरद पवार यांनी मारकडवाडी येथे जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, देशात फक्त तुमच्याच गावाची चर्चा होत आहे. तुम्ही मतदान करायचा निर्णय घेतल्यावर पोलीस खात्याने तुम्हाला थांबवले. तुमच्या गावात तुम्हालाच जमावबंदी केली. हा कुठला कायदा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच तालुक्यातील सर्व गावात ठराव करा. आम्हाला ईव्हीएम मशीनवर मतदान नको, आणि आम्हाला पद्धतीने निवडणूक पाहिजे, असे ठराव करा. या ठरावाची प्रत आम्हाला द्या. आम्ही ती प्रत निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सादर करू, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा