(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shindkheda Vidhan Sabha Election Result 2024 : शिंदखेडा मतदारसंघात जयकुमार रावलांच्या विजयाची घोडदौड कायम; बेडसे, सनेर यांचा पराभव
Shindkheda Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 मध्ये जयकुमार रावल यांनी संदीप बेडसे यांचा 42 हजार 915 च्या मतांनी पराभव केला होता.
Shindkheda Vidhan Sabha Election Result 2024 : धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळाली. माजी मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचा बालेकिल्ला असलेल्या शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे संदीप बेडसे (Sandeep Bedse) निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष असलेले श्याम सनेर (Sham Saner) यांनी देखील उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत जयकुमार रावल यांनी बाजी मारली आहे.
माजी मंत्री असलेले जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला म्हणून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. या मतदारसंघात विविध नागरिक मूलभूत सोयी सुविधांसह शेतीचे आणि रोजगाराचे प्रश्न या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तर दुसरीकडे सुलवाडे, जामफळ, कनोली, उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपण शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढले असल्याचा दावा एकीकडे जयकुमार रावल करीत आहेत. तसेच येत्या काळात रोजगाराच्या विविध संधींसह येथील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना मिळून आधुनिक शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाईल असे देखील आश्वासन एकीकडे जयकुमार रावल यांच्याकडून देण्यात आले. तर दुसरीकडे माजी मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात सर्वसामान नागरिकांमध्ये तसेच विरोधकांमध्ये दहशत निर्माण केली असून त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून या निवडणुकीत जयकुमार रावल यांच्यावर करण्यात आला. यामुळे एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जात असताना दुसरीकडे मात्र शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना भावनिक साद देखील घातली होती.
जयकुमार रावल यांच्या विजयाची घोडदौड कायम
2004 मध्ये तत्कालीन शहादा मतदारसंघातून जयकुमार रावल हे भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले होते. यानंतर प्रत्येक निवडणुकीत जयकुमार रावल यांना विजय मिळत गेला. 2009 मध्ये पुनर्रचनेत निर्माण झालेल्या शिंदखेडा मतदारसंघातून बाजी मारताना त्यांनी काँग्रेसचे शामकांत सनेर यांच्याविरुद्ध 50 हजार 699 चे मताधिक्य घेतले. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा रावल यांनी 42 हजार 158 मताधिक्य घेत पराभव केला. 2009 च्या तुलनेत मताधिक्य घटले असले, तरी 2019 मध्ये रावल यांनी पुन्हा बेडसे यांच्यावर 42 हजार 915 च्या मताधिक्यासह विजय मिळवला आहे. यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील जयकुमार रावल यांच्या विजयाची घोडदौड कायम राहिली.
आणखी वाचा