Gujarat Elections : मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना सुट्टी जाहीर, शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gujarat Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारने हा आदेश जारी केला आहे.
Gujarat Elections 2022 : निवडणूक गुजरातमध्ये, सुट्टी महाराष्ट्रात अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gurajat Assembly Election 2022) मतदानासाठी राज्यातील चार जिल्ह्यांमधील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी सरकारने हा आदेश जारी केला आहे.
गुजरातमध्ये जाऊन मतदान करता यावं यासाठी सुट्टी
1 आणि 5 डिसेंबर या दोन दिवशी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे गुजरातच्या सीमेला लागून आहेत. गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आहेत. त्यांची नावं गुजरातमधील मतदार यादीतच आहेत. त्यामुळे त्यांना तिथे जाऊन मतदान करता यावं, यासाठी दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आहे.
खरंतर निवडणुकीच्या काळात नोकरदारांना मतदान करता यावं, यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत दिली जाते. महाराष्ट्रातील निवडणुकीवेळी अशाप्रकारचा आदेश सरकारच्या वतीने देण्यात येतो. मात्र, आता शेजारच्या राज्यातही मतदारांना मतदान करता यावं, यासाठी महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केली आहे.
आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा आदेश काढल्याचं म्हटलं जात आहे. गुजरातमध्ये मतदार असलेल्या, पण राज्यातील या चार जिल्ह्यात काम करणाऱ्यांना मतदानासाठी ही सु्ट्टी अथवा सवलत दिली जाणार आहे. संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एकूण 182 जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदार पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. तर गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये भाजप गेल्या सहा वेळा सत्तेत आली असून सलग सातव्यांदा विजयाचे लक्ष पक्षाने ठेवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत जागा जिंकण्याच्या दृष्टीने नवीन विक्रम करण्यासाठी पक्ष संघटना आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. त्याचबरोबर यावेळी आम आदमी पक्षही निवडणूक रिंगणात उतरला असून भाजपला थेट टक्कर देण्यासाठी निवडणूक प्रचारात आपली सर्व ताकद पणाला लावत आहे.