शरद पवारांपुढे माढ्याचा पेच कायम, कोणाला मिळणार उमेदवारी? 'या' 3 नावांची चर्चा
Madha Loksabha Election : शरद पवारांनी त्यांचे 9 जागेवरील उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, माढ्यातून शरद पवार कोणाला उमेदवार देणार? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Madha Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण गरम झालं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, सर्वच पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचा माढा लोकसभेचा (Madha Loksabha) उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शरद पवारांनी त्यांचे 9 जागेवरील उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, माढ्यातून शरद पवार कोणाला उमेदवार देणार? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, माढा लोकसभेसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून तीन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
धैर्यशील मोहिते पाटलांचे नाव आघाडीवर
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिलीय. त्यामुळं भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे चित्र माढा लोकसभा मतदारसंघात दिसत आहे. भाजपच्या घटक पक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलाची मागणी देखील केली होती. मात्र, भाजपनं निंबाळकरांची उमेदवारी कायम ठेवलीय. रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानं अकलूजचे मोहिते पाटील नाराज आहेत. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळं निंबाळकरांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. निवडणूक लढवण्याच्या यादीत धैर्यशील मोहिते पाटलांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, शरद पवार त्यांना खरच उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अनिकेत देशमुखांसह अभियसिंह जगताप यांचही नाव चर्चेत
दरम्यान, सांगोला तालुक्याचे माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) हे देखील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मागच्या दोन दिवसापूर्वीच देशमुखांनीशरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. त्यामुळं शरद पवार देशमुखांना उमेदवारी देणार का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. तसेच माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तिसरे चर्चेतील नाव म्हणजे अभयसिंह जगताप (Abhaysinh Jagtap). जगताप हेदेखील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षाचे मेळाव घेत आहेत. यातून त्यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केलीय. मात्र, शरद पवार त्यांना उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काल (9 एप्रिल) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. सर्वात जास्त जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. ठाकरे गटाला 21 जागा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसला 17 जागा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघ सोडून या सर्व जागांवरील उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यामुळं पवार माढ्यातून कोणाला उमेदवारी देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या: