विकासाच्या चर्चेसाठी जाहीर व्यासपीठावर या, पण चिखलफेक करु नका, संभाजी पाटील निलंगेकरांचं अमित देशमुखांना थेट आव्हान
विकासाच्या चर्चेसाठी जाहीर व्यासपीठावर या, पण चिखल फेक करु नका असं आव्हान भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना केलं.
Sambhaji Patil Nilangekar on Amit Deshmukh : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातालरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विकासाच्या चर्चेसाठी जाहीर व्यासपीठावर या, पण चिखल फेक करु नका असं आव्हान भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना केलं आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीचे रंग भरु लागले असून भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस नेते अमित देशमुख यांना कडक शब्दांत थेट चर्चेसाठीचे आव्हान दिले आहे.
जे कोणी अजून निवडणूक रिंगणात आहेत, तेही शेवटी आमच्याबरोबरच येतील
एका व्यासपीठावर या, तुमच्या कार्यकाळातील विकास सांगा, आम्ही आमच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात काय केलं ते नागरिकांसमोर मांडतो, असे खुले आव्हान करत निलंगेकरांनी देशमुखांना डिवचले. महापालिकेत काँग्रेसच्या काळात ठोस विकास झाला नसल्याचा थेट आरोप करत, भाजपने केलेल्या विकासकामांवर जनतेसमोर खुली चर्चा करण्याची तयारी असल्याचे निलंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. या आक्रमक आव्हानामुळं निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. बंडखोरीच्या मुद्द्यावरही निलंगेकर यांनी ठाम भूमिका मांडली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत अपक्ष म्हणून दाखल झालेले भाजपचे तब्बल 120 हून अधिक इच्छुकांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती देत, जे कोणी अजून निवडणूक रिंगणात आहेत, तेही शेवटी आमच्याबरोबरच येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीत चिखलफेक करणे हाच काँग्रेसचा एकमेव अजेंडा
उमेदवारी न मिळाल्याने काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने राजकीय वातावरण तापले असताना, निलंगेकरांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीत चिखलफेक करणे हाच काँग्रेसचा एकमेव अजेंडा उरला आहे. समाजात विष पेरुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे असा आरोप करत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. एकीकडे विकासाच्या मुद्द्यावर थेट चर्चेचे आव्हान, तर दुसरीकडे बंडखोरी आणि काँग्रेसवरील घणाघाती टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर महापालिकेची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार आणि आक्रमक होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, सध्या लातूरमहानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:




















