Amit Thackeray: सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Mahim Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानंतर अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Amit Thackeray On Sada Sarvankar मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु केला आहे. घरोघरी जाऊन अमित ठाकरे माहीम विधानसभेतील सर्व नागरिकांना भेटत आहेत. माहीम विधानसभेत आता तिंरगी लढत होणार हे स्पष्ट झालं आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) अशी लढत पाहायला मिळेल. दरम्यान सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानंतर अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माहीम विधानसभेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्यामुळे तुम्ही आता माहीमधील तिरंगी लढतीकडे कसे पाहता?, असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीनेच लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच मला अजिबात आव्हान वाटत नाही, असंही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
राज ठाकरेंनी सदा सरवणकरांची भेट नाकारली-
गेल्या अनेक दिवसांपासून सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत सतत चर्चा रंगल्या होत्या. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र काल सकाळपासून सदा सरवणकर अनेकांच्या भेटीगाठी घेत होते. माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि सदा सरवणकर काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. पण राज ठाकरेंनी भेट नाकारल्याचं दिसून आलं. याबाबत माहिती देताना सदा सरवणकर म्हणाले की, माझा मुलगा आणि माझे चार पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत. ते आपल्याला भेटू इच्छितात. आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात. त्यावर मला काही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायचे असेल तर घ्या, नाहीतर लढा, असं राज ठाकरेंनी निरोप पाठवला. त्यामुळे कुठलही त्यापुढचं बोलणं झालं नाही. राज ठाकरेंनी भेट सुद्धा नाकारली, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.
माहीममधील Inside Story, Video:
संबंधित बातमी:
सदा सरवणकरांनी शेवटच्या दिवशी मोठा गेम खेळला, राजकीय नाट्याचा फोकस स्वत:वर ठेवत मास्टरस्ट्रोक मारला