Rohit Patil : शरद पवारांनी कानात काय सांगितलं होतं? रोहित पाटलांचा 'त्या' व्हायरल फोटोबाबत मोठा खुलासा; म्हणाले, 'साहेबांना काळजी...'
Rohit Patil on Sharad Pawar: निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांनी रोहित पाटलांची भेट घेतली होती, सभा घेतली होती, त्यावेळचा त्यांचा एक फोटो देखील चांगलाच चर्चेत आला होता. त्या फोटोबाबत आज रोहित पाटील यांनी भाष्य केलं आहे.
Rohit Patil On Viral Photo With Sharad Pawar : राज्यात काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठं यश मिळवलं. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने मोठी तयारी देखील केली होती. मात्र, त्यांना मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. काही मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झाली. काही ठिकाणी नवे उमेदवार देण्यात आले होते, त्यांना मतदारांनी विधानसभेवर जाण्याची संधी दिली. तर काहींचा पराभव झाला. अशातच तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातील सर्वात कमी वयाचे महाविकास आघाडीच उमेदवार रोहित पाटील (Rohit Patil) यांचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील (Rohit Patil) हे निवडून आले, त्यांच्या विजयासाठी शरद पवारांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. निवडणुकीच्या दरम्यान शरद पवारांनी (Sharad Pawar) रोहित पाटलांची भेट घेतली होती, मतदारसंघात सभा घेतली होती, त्यावेळचा त्यांचा एक फोटो देखील चांगलाच चर्चेत आला होता. त्या फोटोबाबत आज रोहित पाटील (Rohit Patil)मयांनी भाष्य केलं आहे.
रोहित पाटील (Rohit Patil) यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मुलाखतीदरम्यान रोहित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा कानात काहीतरी सांगत असल्याचा व्हायरल झालेल्या फोटोवरती विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. व्हायरल झालेला फोटो हा तासगावमधील प्रचारसभा संपल्यानंतर होता. शरद पवार (Sharad Pawar) यांनी हेलिपॅडवर रोहित पाटील यांना जवळ घेत त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं होतं. रोहित पाटील आणि शरद पवारांचा हा पाठमोरा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी या फोटोची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) कानात नेमकं काय सांगितलं ते आज रोहित पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितलं आहे.
View this post on Instagram
नेमकं काय म्हणाले रोहित पाटील?
माझा कट्ट्यावर रोहित पाटील (Rohit Patil) यांना व्हायरल झालेल्या फोटोबाबत प्रश्न विचारण्यात आला, शरद पवार कानात नेमकं काय सांगत होते? तेव्हा रोहित पाटील म्हणाले, "मी विधानसभा निवडणुकीत काय काळजी घेतली पाहिजे, साहेबांनी मला निवडणुकीच्या दरम्यान अगदी चार ते पाच वेळा फोन करून सांगितलं होतं. त्यांना एक भीती होती. मला शरद पवारांनी एक आठवण सांगितली ते 27 वर्षाचे असताना त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती. त्यांच्या मतदारसंघातली तेव्हाची परिस्थिती देखील अशीच होती, सर्व विरोधक त्यांच्या विरोधात एकवटले होते. माझ्याही बाबतीत तशीच परिस्थिती होती. त्यामुळे साहेबांना काळजी होती. मी माझ्या मतदारसंघांमध्ये काय करतोय, काय केलं. हे कशा पद्धतीने मी मांडलं पाहिजे, याचं मार्गदर्शन मला शरद पवारांनी केलं आणि काही चुका करायचा नाहीत याबाबत देखील मला शरद पवारांनी मला सांगितलं", असं उत्तर रोहित आर आर आबा पाटील (Rohit Patil) यांनी दिलं आहे.
एका मताने का होईना मी निवडून येणार हा विश्वास...
विधानसभा निवडणुकीत हरलो तर पुढे काय करायचं याचा विचार एक दिवस आधीच करून ठेवला होता, असेही रोहित पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र, एका मताने का होईना मी निवडून येणार हा विश्वास देखील रोहित पाटलांना होता. माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात बोलताना रोहित पाटलांनी निकालाचा तो किस्सा देखील सांगितला आहे. 23 तारखेला निकाल होता, त्या दिवसाच्या आदल्या रात्री असं वाटत होतं, गेली नऊ वर्ष आपण या मतदारसंघात फिरतोय, उमेदीचे असतील किंवा कशीही असतील नऊ वर्ष आपण या क्षेत्रात घातलेले आहेत. यातूनही काही चांगलं नाही झालं तर मागच्या नऊ वर्षांचा फलित काय याची जरा चिंता वाटत होती. मग पुढे काय करायचं याचा विचार देखील मी आदल्या रात्री करून ठेवलं होतं. पण मला विश्वास होता एका मताने का होईना मी निवडून येणार आहे. तो एक विश्वास शंभर टक्के मनामध्ये होता आणि मी जिंकलो असं रोहित पाटील (Rohit Patil) म्हणालेत.
रोहित पाटील विरूध्द संजय काका पाटील अशी लढत
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विरूध्द संजय काका पाटील अशी लढत झाली. 25 वर्षांच्या रोहित पाटलांनी सांगलीचे दोन वेळचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे आव्हान होते. रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांचा तब्बल 27,644 मतांनी पराभव केला होता.