CM Post: "एकनाथ शिंदेंना भाजपनं 'CM' पदाचा शब्द दिलाच नाही, त्यांनी हवं तर....", केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान
Ramdas Athwale On CM Post: देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं आठवले म्हणालेत. निकालापुर्वी एकनाथ शिंदे यांना कोणतही आश्वासन दिलं नव्हतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई: राज्यात विधासभा निवडणुका पार पडल्या. महायुतीने मोठं यश या निवडणुकीमध्ये मिळवलं. त्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण याबाबतच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्याचबरोबर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले की दिल्लीत पक्षश्रेष्ठी याबाबतचा निर्णय घेतील, तो निर्णय सर्व नेत्यांना मान्य असेल, मात्र आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं आठवले (Ramdas Athawale) म्हणालेत. निकालापुर्वी एकनाथ शिंदे यांना कोणतही आश्वासन दिलं नव्हतं असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपने ठरवले आहे, असे सांगून राजकीय वातावरण तापवलं आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रात येण्याचा सल्लाही दिला आहे.
नेमकं काय म्हणाले आठवले?
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा मेसेज भाजपच्या हायकंमांडने एकनाथ शिंदेंना दिला आहे. पण त्यांच्यात थोडी नाराजी आहे. त्यांना पुन्हा एकदा संधा दिली जावी असं वाटतं आहे. बिहारचा फॉर्म्युला इथे लागू करण्याचा मुद्दा नाही. तिथले सूत्र वेगळे होते. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांना आधीच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. त्यांना आश्वासन दिलं होतं. परंतु येथे असे कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासर्वांचं योगदान आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. मात्र, त्यामध्ये सर्वांचं योगदान होतं. शिंदे गटाच्या नेत्यांची मुख्यमंत्रापदाची मागणी योग्य असली तरी भाजप पक्ष त्यासाठी तयार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी भाजपने सांगितलेली गोष्ट मान्य केली पाहिजे. त्यांनी मंत्रीमंडळात आलं पाहिजे. त्यांना हवं तर त्यांनी केंद्रात आलं पाहिजे, त्यांनी मोदी आणि शाहांशी चर्चा करून कॅबीनेट मंत्रीपदी आलं पाहिजे, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.
रामदास आठवले यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदे यांनी ते मान्य करावे, निवडणूक जिंकल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री होतील, असे कोणतेही आश्वासन त्यांना देण्यात आलेले नाही. फडणवीसांना मुख्यमंत्री केले जाईल आणि एकनाथ शिंदे यांना हवं असल्यास त्यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश करावा असं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.