मोठी बातमी! दक्षिण नागपूरसह हिंगणा मतदारसंघात मनसेचा भाजपला पाठिंबा; राज ठाकरेंचे आदेश
Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : नागपूर जिल्ह्याच्या दोन मतदारसंघात मनसेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. दक्षिण नागपूर आणि हिंगणा विधानसभेत मनसेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे.
Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचारतोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. त्याच अनुषंगाने आज काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे महयुतीच्या गोटातून एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या दोन मतदारसंघात मनसेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. दक्षिण नागपूर (South Nagpur Constituency) आणि हिंगणा विधानसभेत (Hingana Constituency) मनसेने आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर दोन्ही उमेदवारांनी आपला पाठिंबा भाजप उमेदवाराला दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूर आणि हिंगणामध्ये मनसेच्या पाठिंब्याने भाजपचा विजयाचा मार्ग अधिक सुखकर झाल्याचे बोलले जात आहे.
अतितटीच्या लढतीत दक्षिण नागपुरात भाजपची ताकद वाढणार?
दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात भाजपने मोहन मते यांना सलग दुसऱ्यांदा संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर गिरीश पांडव यांनाही काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा मोहन मते यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवत आव्हान दिले आहे. गेल्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या लढतीत मोहन मते यांचा फार कमी मताधिक्याने विजय झाला होता. त्यामुळे यंदा ही ही लढाई अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनुप दुरुगकर यांना संधी देत मैदानात उतरवले होते. मात्र आज राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अनुप दुरुगकर या मनसेच्या उमेदवाराने आपला पाठिंबा भाजप उमेदवाराला दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूरमध्ये भाजपला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.
भाजपचे उमेदवार समीर मेघेंना मनसेचा पाठिंबा
तर दुसरीकडे हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार समीर मेघे विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रमेशचंद बंग आणि बसपाकडून डॉ. देवेंद्र कैकाडेनिवडणुकीच्या मैदानात आहे. दरम्यान या तिरंगी लढतीत मनसेने बिजाराम किनकर यांना मैदानात उतरवत ही लढत अधिक रंगतदार केली. दरम्यान याही मतदारसंघात मनसेच्या उमेदवार बिजाराम किनकर यांनी आपला पाठिंबा भाजप उमेदवार समीर मेघे यांना दिला आहे. त्यामुळे दक्षिण नागपूरसह हिंगणा विधानसभा मतदारसंघातही भाजपला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.
भाजप आमदारावर मनसेकडून तोंडसुख
यवतमाळच्या वणी विधानसभेतील मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी भाजपाचे उमेदवार आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. यांच्या व्यंगावर उंबरकर यांनी तोंडसुख घेत त्यांची टिंगल उडविली. आमदार बोदकुरवार यांना साधं बोलता येत नाही, त्यामुळे ते विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मांडणार, बोदकुरवार यांना फक्त रस्ते पाहिजे, रस्त्यातून पैसे, पैशातून प्रॉपर्टी आणि ठेकेदारीतील भागीदारी असा त्यांचा व्यवसाय असल्याचा गंभीर आरोप राजु उंबरकर यांनी केला.
हे ही वाचा