Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का, प्रकाश महाजन म्हणाले, त्यांनी साद घालावी!
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळाला. तर 128 मतदारसंघात उमेदवार उभ्या केलेल्या मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठाकरे बंधुंना विधानसभा निवडणुकीत बसलेल्या या झटक्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आगामी काळात एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, जी मंडळी दुसऱ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करत होती, त्यांचा अस्तित्व पणाला लागलं तेव्हा आमची गरज त्यांना वाटते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे, यासाठी आम्ही स्वतःहून साद यापूर्वी घातली होती. आता जर त्यांनी साद घातली तर राज ठाकरे निर्णय घेतील, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले. समोरच्याची इच्छा काय आहे हे पाहिलं जाईल. राज ठाकरे तर कधीही मैत्रीचा हात समोर करतात. पण आमचा पूर्वानुभव वेगळा आहे. अमित ठाकरे आजारी असताना त्यांनी आमचे नगरसेवक त्यांनी फोडले
ज्यांची सत्ता गेली त्यांना अस्वस्थता वाटू शकते, आम्ही सगळ्या गोष्टीला तोंड देऊ. पराभव आम्हाला नवीन नाही. त्यातून आम्ही उभारी घेऊ. आज मुंबईला टोल फ्री झाला त्याचं यश मनसेचं आहे, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.
भाजपने मनसेला एकटं पाडलं; प्रकाश महाजनांचा आरोप
माहीम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मनसेला एकट पाडले. दिलेला शब्द युतीच्या नावावर पाळला नाही. राज ठाकरे या सगळ्या पराभवावर आत्मचिंतन करतील, निराशा, हताशा येईल. पण ती तात्पुरती असते, त्यातून आम्ही बाहेर पडून लढू. मनसे तीन ते पाच जागा जिंकू अशी अपेक्षा मला होती. लाडक्या बहिणीमुळे प्रस्थापित पक्ष सुद्धा वाहून गेले, त्यात आमचे सुद्धा ते हाल झाले.
ज्यावेळी मी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला पाहतो त्यापेक्षा आमची परिस्थिती बरी वाटते. कारण ते काही काळ सत्तेत सुद्धा राहिले आहेत, त्यांचे आमदार खासदार होते. लढणारा मनसैनिक थोडासा या निकलानंतर खचतो, सेनापती तो आवेग पुन्हा एकदा त्यांच्यात भरू शकतो. मी बाकीच्या लोकांसारखा EVM मशिनला दोष देत नाही. पण एवढा अंतर्गत सुप्त प्रवाह वाहत आहे हे मला प्रचार दरम्यान वाटलं नाही. आम्हाला वाटले होते काही आमदार निवडून येतील, पण ते झालं नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.
राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल: प्रकाश महाजन
सध्याची परिस्थिती पाहता राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे वाटते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर वक्तव्य केलं होतं की, अमित ठाकरे ना आम्ही पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी युतीच्या नावावर माघार घेतली, राजकारणात शब्द पाळायचा असतो मोडायचा नसतो. भाजपने शब्द पाळला नाही. मनसेला भाजपने एकटे पाडले. पुढच्या वेळेस माणूस सावध होतो. असे झटके आम्ही बरेच खाल्ले आहेत. एकत्र येऊन उमेदवार जाहीर करणारे सुद्धा आम्ही पाहिले आहेत, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
आणखी वाचा