मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईतील भायखळा मतदारसंघात मनसेने शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मनसेकडून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमाने सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही प्रचारसभांचा धडाका लागवा आहे. आत्तापर्यंत तुम्ही सर्वच पक्षांना सत्तेत बसण्याची संधी दिलीय. त्यामुळे, ही संधी आहे, एकवेळ माझ्या पक्षाला संधी द्या, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचाय, असे राज ठाकरे म्हणत आहेत. एकीकडे राज ठाकरेंकडून मनसेला सत्ता देण्याची मागणी करत असताना मनसेनं (MNS) विधानसभा निवडणुकीत 3 मतदारसंघात इतर पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतील भायखळा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघातील उमेदवारांना मनसेनं पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर, आता काही मतदारसंघात उमेदवार पाहून पाठिंबा दिला जात आहे.
मुंबईतील भायखळा मतदारसंघात मनसेने शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मनसेकडून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामिनी जाधव यांच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील मतदारसंघात यामिनी जाधव यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे, येथील निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. भायखळा मतदारसंघात डॉन अरुण गवळींच्या मुलीला तिकीट देण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर मनोज जामसुतकर यांनी शिवसेना ठाकरे गटाने मैदानात उतरवले आहे.
कर्जत-खालापूर मतदारसंघात पाठिंबा
मुंबईतील भायखळानंतर कर्जत-खालापूर मतदारसंघातही मनसेनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. येथे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना मनसेने पाठिंबा केला जाहीर केला आहे. घारे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात होते. मात्र, ही जागा महेंद्र थोरवे यांना गेल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता, सुधाकर घारे यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आणि मनसेने त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे, दोन मतदारसंघात मनसेनं दुसऱ्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, यापूर्वी मावळ मतदारसंघातही मनसेनं बापू भेगडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तेथे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याविरुद्ध भाजप बाळा भेगडे यांनी बंडखोरी केली आहे.