(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Election : युवकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट
आज मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Manipur Election : मणिपूरमध्ये आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 38 जागांसाठी मतदान होणार आहे. या 38 जागांसाठी 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: युवक आणि प्रथमच मतदान करणाऱ्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांपैकी मणिपूर हे एक आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामधील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज मणिपूरमध्ये 38 जागांवर मतदान होणार असून, यामध्ये 15 महिला उमेदवारांसह 173 उमेदवारांचे भवितव्य राज्यातील मतदार ठरवणार आहेत. पहिल्या टप्प्यात 6 लाख 29 हजार 276 महिला मतदारांसह 12 लाख 22 हजार 713 मतदार आपला हक्क बजावणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचार्यांचा मोठा ताफा सर्व 38 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आला आहे.
Urging all those voting today in the first phase of the Manipur Assembly elections to turnout in record numbers and cast their vote. I particularly call upon the young and first time voters to exercise their franchise.
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2022
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, आज मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी यासाठी जोरदार प्रचार केला होता. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, त्रिपुराचे समकक्ष बिप्लब कुमार देब, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) प्रमुख कोनराड के संगमा, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा, राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी यावेळी जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या सर्व निवडणुकांचे निकाल 10 मार्चला लागणार आहेत. त्यामुळे मणिपूरमध्ये कोणाची सत्ता येणार यासाठी 10 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: