(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Election : मणिपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान, 38 जागांसाठी 173 उमेदवार रिंगणात
आज मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 38 जागांसाठी मतदान होणार आहे.
Manipur Election 1st Phase Voting : सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उत्तर प्रदेशमधील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. दरम्यान, आज मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. या पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 38 जागांसाठी मतदान होणार आहे. या 38 जागांसाठी 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या सर्वांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामधील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज मणिपूरमध्ये 38 जागांवर मतदान होणार असून, यामध्ये 15 महिला उमेदवारांसह 173 उमेदवारांचे भवितव्य राज्यातील मतदार ठरवणार आहेत. पहिल्या टप्प्यात 6 लाख 29 हजार 276 महिला मतदारांसह 12 लाख 22 हजार 713 मतदार 15 महिलांसह 173 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचार्यांचा मोठा ताफा सर्व 38 विधानसभा मतदारसंघात तैनात करण्यात आला आहे. तर 9 हजार 895 मतदान कर्मचारी त्यांच्या नियुक्त केलेल्या 1 हजार 721 मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, त्रिपुराचे समकक्ष बिप्लब कुमार देब, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) प्रमुख कोनराड के संगमा, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा, राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी यावेळी जोरदार प्रचार केल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार एन. बिरेन सिंग, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी थोंगम बिस्वजित सिंग, एनपीपीचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री युमनम जॉयकुमार सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते थोकचोम सत्यब्रत सिंग, काँग्रेसचे रतनकुमार सिंग, लोकेश्वर सिंग, सरचंद्र सिंग, आमदार अकोजम मीराबाई देवी यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: