Prashant Kishor : हिम्मत असेल तर पूर्ण चॅट जाहीर करा, प्रशांत किशोर यांचं भाजपला आव्हान
Prashant Kishor Audio Clip: बंगालची निवडणूक (West Bengal election 2021) अंतिम टप्प्यात आली असली तरी बंगालचं राजकारण अजूनही गरम आहे. प्रशांत किशोर यांच्या ऑडिओ क्लिपवरून खळबळ उडाली असताना आता प्रशांत किशोर यांनी त्यावरून भाजपला आव्हान दिलं आहे.
नवी दिल्ली : तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार असलेल्या प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलेल्याची एक ऑडिओ क्लिप बाहेर आली होती. आता त्यावरून बंगालमधील राजकारण तापलं असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिम्मत असेल तर भाजपने ती संपूर्ण ऑडिओ क्लिप बाहेर आणावी असं आव्हान प्रशांत किशोर यांनी दिलं आहे.
प्रशांत किशोर काय म्हणाले?
प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून मत मांडलंय. ते म्हणाले की, "हिम्मत असेल तर माझं संपूर्ण संभाषण भाजपनं लोकांसमोर आणावं. मला आनंद आहे की भाजपवाले आपल्या नेत्यांपेक्षा माझं वक्तव्य जास्त गंभीरपणे घेतात. माझं संभाषण मोडून-तोडून जनतेसममोर आणणाऱ्या भाजपने ते संपूर्ण संभाषण जाहीर करावं. मी या आधीही सांगितलंय, आताही सांगतोय की, पश्चिम बंगालमध्ये भाजप 100 चा आकडाही पार करणार नाही."
I am glad BJP is taking my chat more seriously than words of their own leaders!😊
— Prashant Kishor (@PrashantKishor) April 10, 2021
They should show courage & share the full chat instead of getting excited with selective use of parts of it.
I have said this before & repeating again - BJP will not to CROSS 100 in WB. Period.
काय आहे प्रकरण?
एक दिवसापूर्वी भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली होती. प्रशांत किशोर यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यामध्ये प्रशांत किशोर म्हणतात की, "तीन मुद्दे असे आहेत की जे भाजपला फायदा मिळवून देण्याची शक्यता आहे. पहिलं म्हणजे धृवीकरण, दुसरं म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील राग आणि तिसरं म्हणजे दलित मतं."
या ऑडिओ क्लिपला ट्वीट करताना अमित मालवीय म्हणाले होते की, तृणमूलला आता निवडणूक जिंकणं शक्य नाही. अमित मालवीय यांच्या या ट्वीटनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या :