(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE : मागील निवडणुकीपेक्षा यावेळी एनडीएच्या जागा वाढतील, नरेंद्र मोदींचा दावा
2014 लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या, तिथेही आमच्या जागा वाढतील, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान एबीपी न्यूजला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी राष्ट्रवाद, महागाई, गरीबी, रोजगार, पुलवामा दहशतवादी हल्ला अशा विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांचं कल्याण करणे ही माझी राष्ट्रभक्ती आहे आणि हाच माझा राष्ट्रवाद आहे. भारतीय लष्कर सक्षम, सामर्थ्यवान बनावं त्यांना कोणत्याही साधनांची कमी भासू नये ही माझी राष्ट्रभक्ती आहे. मसूद अझहरला दहशतवादी घोषित करणे हीच राष्ट्रभक्ती आहे. काँग्रेसच्या काळात विकासाची गती कमी झाली होती, तो विकास करणे ही राष्ट्रभक्ती आहे, अशी राष्ट्रवादाची व्याख्या नरेंद्र मोदींनी सांगितली.
भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वासही नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. ज्याप्रकारे गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने कामे केली, त्यानुसार आम्ही पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ असा विश्वास देशातील 125 कोटी जनतेचा आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या, तिथेही आमच्या जागा वाढतील, असा दावा नरेंद्र मोदींनी केला.
गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी एनडीएच्या जागा वाढतील. मित्रपक्षांनाही चांगलं यश या निवडणुकीत मिळेल. देशातील जनता भाजपसह मित्रपक्षांच्या पाठीशी आहे. त्यामुळे एनडीए सत्तेत येणार ही जनतेचीच इच्छा आहे. अबकी बार 300 पार अशा घोषणा लोकांकडून दिल्या जात आहेत. यावर बोलताना मोदी म्हणाले की, जनतेच्या तोंडून जो आवाज निघतो त्याचा सन्मान केला पाहिजे.
भारतीय सैन्याच्या नावाने मतं मागत असल्याचा आरोप विरोधकांकडून नरेंद्र मोदींवर केला जात आहे. त्यावर बोलताना मोदी म्हणाले की, ही निवडणूक नगरपालिकेची नाही. देशाच्या निवडणुकीत भारतीय सेना, देशाची सुरक्षा, देशाच्या सीमा, दहशतवाद हे मुद्दे प्रचारामध्ये योग्य आहेत. कारण जनतेला याची माहिती असणे त्यांचा अधिकार आहे. उलट काँग्रेसला विचारलं पाहिजे की त्यांचं देशाच्या सुरक्षेबाबत काय धोरण आहे.