विरोधक संपवण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप, तर मुख्यमंत्री प्रांतवादी असल्याचा ठपका
भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. सत्ताधारी सत्ता हातात ठेवण्यासाठी जे करता येईल ते करत आहेत. सीबीआय, ईडीचा पुरेपूर वापर करत आहेत. फोन टॅपिंग करण्याचे प्रकार होत असल्याची शक्यता आहे, असा आरोप शरद पवारांनी केला.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रांतवादाचा ठपका ठेवला आहे. तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरऐवजी पुण्यातून का लढताहेत असा सवाल पवारांनी उपस्थित केला. अजित पवारांचा राजीनामा, राष्ट्रवादीतील आऊटगोईंग, आगामी विधानसभा निवडणूक अशा अनेक मुद्द्यांवर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी आपली भूमिका मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रांतवादी
राज्याच्या विकासासाठी जी काळजी घ्यायला हवी ती या सरकारच्या कार्यकाळात घेतली गेली नाही. राज्याचा प्रमुख हा प्रमुख वाटला पाहिजे. वसंतराव नाईकांनी कधीच प्रांतवाद केला नाही. संपूर्ण राज्याचा विश्वास त्यांनी संपादन केला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरुवातच विदर्भवादी म्हणून झाली. जी व्यक्ती राज्याचा विचार न करता राज्याचे भाग व्हावे, असा विचार करते त्यांच्याकडून काही अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांची भूमिका एका विशिष्ट भागाची जपणूक करणारी होती, असा आरोप शरद पवारांनी केला.
इच्छा असताना मनसेला सोबत घेऊ शकलो नाही
काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीत मनसेला सोबत घ्यावं, अशी भूमिका राष्ट्रवादीची होती. आमची आघाडी आहे, त्यामुळे आघाडीत नवीन मित्रपक्ष घ्यायचे असतील तर आम्ही चर्चा करतो. मनसेला घ्यावे यासाठी आम्ही आग्रही होतो. मात्र आमच्या इतर मित्र पक्षांना आम्ही समजवू शकलो नाही. त्यामुळे इच्छा असतानाही आम्ही मनसेला आघाडीत घेऊ शकलो नाही, असं शरद पवार यांना म्हटलं.
सरकार फोन टॅपिंग करत असल्याचा संशय
भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. 1985 ची निवडणूक आमच्यासाठी अत्यंत कठीण होती आणि यंदाची निवडणूकही कठीण आहे. पूर्वी सत्ताधारी विरोधकांना सत्तेचा वापर करून नमवायचे नाहीत. मात्र आता सत्ताधारी सत्ता हातात ठेवण्यासाठी जे करता येईल ते करत आहेत. सीबीआय, ईडीचा पुरेपूर वापर करत आहेत. फोन टॅपिंग करण्याचे प्रकार होत असल्याची शक्यता आहे. मी कुणाशी बोललो, निवडणुकीत मदत केली पाहिजे असं वाटलं तर संध्याकाळी त्यांच्याकडे इन्कम टॅक्सचे लोक जातात, हे कसं होतं? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीतून सोडून गेलेल्या नेत्यांवरही शरद पवारांनी वक्तव्य केलं. काही चांगले लोकही पक्ष सोडून गेले. संघर्ष करण्याचा प्रसंग येतो, त्यावेळी जोमाने तोंड द्यायला कमी पडले, असे लोक सोडून गेले. अनेकांनी मला पक्ष सोडण्याआधी कळवलं होतं आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. काही जण सांगून गेले, काही न सांगताच गेले. त्यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव होता. संकटाच्या काळात जे उभे राहतील, अशी लोकं तयार करायला मी पण कमी पडलो, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीतून नेते सोडून जात असताना जे पेरले ते उगवले अशी टीका शिवसेनेने केली होती. त्यावरही शरद पवारांनी स्पष्ट केलं की, धनंजय मुंडे यांच्या वडिलांना मी सांगितलं पक्ष सोडू नका. दिवंगत गोपीनाथ मुंडे स्वतः भाजपमध्ये अस्वस्थ होते, मात्र मी त्यांना पक्ष सोडू नका असं सांगितलं. छगन भुजबळांचा विषय वेगळा होता. त्यांनी वेगळ्या भूमिकेसाठी पक्ष सोडला, आम्ही बोललो म्हणून ते आले असं नाही. आम्ही हे पेरले नाही, आम्ही रास्त भूमिका घेतल्या त्यावर इतरांनी निर्णय घेतला, असं शरद पवार यांनी म्हटलं.
पक्ष सोडणाऱ्या नेत्यांबाबत विचारलं असता शरद पवार पत्रकार परिषदेतच भडकले होते. त्यावरही पवारांना आपण का चिडलो? याचं स्पष्टीकरण दिलं. प्रश्न विचारणारं कोण यावर माझं लक्ष असतं. प्रश्न विचारणारा व्यक्ती सत्ताधारी पक्षातील व्यक्तीच्या जवळचा होता, त्यामुळे मी तसं वागल्याचं पवारांनी म्हटलं.
बँकेचा संचालक नसतानाही ईडीची नोटीस
राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडी नोटीशीबाबत शरद पवार म्हणाले की, धनंजय महाडिक यांच्यासारख्या काही नेत्यांच्या अडचणीच्या कारखान्यांना सरकारने मदत केली. हेच राज्य सहकारी बँकेने केले तर कारवाई सुरु केली. मी तर बँकेचा कधी संचालकही नव्हतो. माझा विचार कुणी घेतो म्हणजे मी गुन्हेगार ठरत नाही.
ईडी नोटीसचा मला त्रास झाला नाही. मात्र अजित फार हळवा आहे. राज्य सहकारी बँकेत त्याचं नाव आलं, त्यात माझं पण नाव आलं. मात्र मला नोटीस आली म्हणून तो दुखावला, म्हणून त्याने राजीनामा दिला. जे घडलं ते एक दिवसाचं होतं. हळवेपणा मारक आहे किंवा तारक आहे, यापेक्षा चूक झाल्यावर दुरुस्त करणं महत्वाचं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं.
आरेतील झाडे कापणे अतिरेकी पाऊल
आरे वृक्षतोडीवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना शरद पवार म्हणाले की, विकास कामांच्या बाबत विरोध घ्यायचा नसतो. लोकांच्या मनातील शंका दूर केल्या पाहिजेत. काही पर्याय असतील तर त्याचा विचार करायला पाहिजे. आरेमध्ये मेट्रो प्रकल्प घेतल्यामुळे अनेक पर्यावरणवादी गटांमध्ये अस्वस्थता आली. मात्र योग्य पर्यायांचा गंभीर विचार झाला नाही. राज्य सरकारने विरोधकांना बोलवून चर्चा केली असती, तर ही वेळ आली नसती. रातोरात झाडे कापणे हे अतिरेकी पाऊल होतं. संवेदनशील विषयात लोकांना विश्वासात घेणे सरकार कमी पडले. कदाचित कोण अडवणार, असा उद्दामपणा सरकारमध्ये असेल, असं शरद पवार म्हणाले.