Maharashtra Vidhan Sabha Election 2024: गीता जैन यांचं तिकीट कापलं; मीरा-भाईंदरमधून नरेंद्र मेहतांना उमेदवारी, भाजपचा मोठा निर्णय
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
Geeta Jain Mira Bhayandar Vidhan Sabha: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांना संधी देण्यात आली आहे. विद्यामान अपक्ष आणि महायुतीच्या समर्थक आमदार गीता जैन (Geeta Jain) यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आमदार नरेंद्र मेहतांना भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी पराभवाची धूळ चारली होती. दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर आज दुपारी 3 वाजता गीत जैन पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये गीता जैन नेमकी कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मिरा-भाईंदर मतदारसंघातून गीता जैन आणि नरेंद्र मेहता हे दोघेही इच्छुक होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांकडून शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येत होते. उमेदवारी मिळावी यासाठी या दोघांनीही सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर अखेर या मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्यात आला असून आज नरेंद्र मेहता यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
भाजपची जागा वाटपात मित्रपक्षांसह 150 पर्यंत घौडदौड
महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. भाजपनं आतापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपनं 148 जागांवर उमेदवार जाहीर केले असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 65 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 49 जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
भाजप - 148
आणि मित्र पक्ष - 4
एकूण - 152
यंदा कोण मारणार बाजी?
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळणं, शिंदेंनी भाजपच्या साथीनं महायुती सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा