रवींद्र वायकर 48 मतांनी जिंकले, आधी विजयी घोषित केलेले अमोल किर्तीकर हरले, सुपर ओव्हरला लाजवणारा थरार!
Lok Sabha Election Result 2024: शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांनी फेरमतमोजणीत बाजी मारली असून केवळ 48 मतांनी विजय मिळवला आहे.
Mumbai Lok Sabha Election Result : मुंबई : महाराष्ट्राचे लोकसभा निकाल (Maharashtra Lok Sabha Election 2024) समोर आले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील जागांवरही ठाकरेंचा डंका पाहायला मिळाला. पण मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात मोठा फेरबदल पाहायला मिळत आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघा फेरमतमोजणी करण्यात आली असून यामध्ये शिंदे गटाचे रविंद्र वायकर (Ravindra Waikar) विजयी झाले आहेत. केवळ 48 मतांनी फेरमतमोजणीत रवींद्र वायकरांचा विजय झाला असून अमोल कीर्तिकरांचा (Amol Kirtikar) पराभव झाला आहे.
उत्तर-पश्चिम मतदारसंघात मोठा थरार
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. याआधी अमोल कीर्तीकर 681 मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. यामध्ये वायकर हे 75 मतांनी आघाडीवर आले. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये कीर्तिकर आणि वायकर यांचे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत असल्याची माहिती समोर आली आहे.
अटीतटीच्या लढतीत मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांचा विजय झाल्याचं सांगणात आलं. 48 मतांनी वायकर यांचा विजय झाल्याचं समोर आलं. EVM मतमोजणीत अमोल किर्तीकर यांना एक मत होत जास्त होतं. त्यामुळे EVM मतदानात अमोल किर्तिकर यांना 40 हजार 0995 मतं तर रवींद्र वायकर यांना 40 हजार 0994 मतं होती. तर पोस्टल मतदानात रवींद्र वायकर यांना 49 मतांची आघाडी होती त्यामुळे पोस्टल मतदान एकूण 3049 मतं आहेत. त्यातील अमोल कीर्तिकरांना 1500, तर रविंद्र वायकरांना 1549 मतं मिळाली. त्यानंतर पुन्हा पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली.
मुंबई उत्तर पश्चिममध्ये 111 टपाली मतदान बाद झाल होतं. नियमांनुसार, बाद झालेलं टपाली मतदान मताधिक्यापेक्षा जास्त असल्यास बाद झालेल्या टपाली मतदानाची पूर्नपडताळणी होते. त्यानुसार, मुंबईत उत्तर पश्चिममध्ये पुन्हा फेरमोजणी पार पडली. मुंबई उत्तर पश्चिम मधील बाद झालेल्या 111 टपाली मतदानाची पुर्नपडताळणी करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेऱ्या आणि टपाली मात्र पत्रिकांच्या निकालानंतर मुंबई उत्तर पश्चिममध्ये Invalid Postal Votes चे verification करण्यात आलं. अमोल गाजनान कीर्तिकरांना 4 लाख 52 हजार 596 मतं मिळाली. तर, रवींद्र वायकरांना 4 लाख 52 हजार 644 मतं मिळाली. अखेर रविंद्र वायकरांचा 48 मतांनी विजय झाला.