दुसऱ्या निवडणुकीत मंत्री, तिसऱ्यामध्ये थेट मुख्यमंत्री, कोण आहेत मोहन यादव ?
Mohan Yadav : मोहन यादव 2013 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर दहा वर्षांत ते मुख्यमंत्र्यांच्या (Madhya Pradesh Chief Minister) खुर्चीवर विराजमान होणार आहेत.
MP BJP New CM : आठ दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची (Madhya Pradesh Chief Minister) घोषणा करण्यात आली. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे. मोहन यादव (Mohan Yadav) आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजपच्या (BJP) विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिल्याने, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झालं. मोहन यादव 2013 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर दहा वर्षांत ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. मोहन यादव यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात..
मोहन यादव उज्जैन दक्षिणमधून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलं आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केलेय. 2020 ते 2023 यादरम्यान मोहन यादव यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलेय. 2013 मध्ये मोहन यादव पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 10 वर्षांमध्ये आणि तिसऱ्या टर्ममध्ये मोहन यादव यांनी मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला आहे.
शिवराज सिंह चौहान यांचे घेतले आशीर्वाद -
विधीमंडळ गटनेता ठरवण्याच्या बैठकीत डॉ. मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी मोहन यादव यांनी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आशीर्वाद घेतले. शिवराज सिंह यांनीही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून आशीर्वाद दिला. मोहन यादव हे मध्य प्रदेशातील भाजपाचा मोठा ओबीसी चेहरा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने त्यांच्या नावाची घोषणा केल्याची चर्चा आहे. मोहन यादव यांची शैक्षणिक पात्रता पीएचडी आहे. 2020 मध्ये त्यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते 2023 पर्यंत मुख्यमंत्री पदावर पोहचले आहेत.
राजकीय प्रवास कसा राहिला ?
58 वर्षीय मोहन यादव यांची राजकीय सुरुवात 1984 मध्ये झाली होती. 1984 मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाईन केली होती. मोहन यादव यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघासाठीही काम केलेय. ते संघाच्या जवळचे मानले जातात. 2013 मध्ये मोहन यादव यांनी उज्जैन दक्षिण मधून आमदारकी लढवली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेत. मोहन यादव यांनी काँग्रेसच्या चेतन प्रेमनारायण यांचा 12941 मतांनी पराभव केला. मोहन यादव यांना 95699 इतकी मतं मिळाली होती.
डॉ. मोहन यादव भाजपचे अनुभवी नेते -
डॉ.मोहन यादव यांच्या नावाची घोषणा होताच उज्जैनमध्ये जल्लोष करण्यात आला. मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हते, त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर उज्जैनकरांना सुखद धक्का बसला. मोहन यादव भाजपचे अनुभवी नेते आहेत. 1984 पासून ते भाजपसाठी काम करत आहेत. 2004 ते 2010 पर्यंत मोहन यादव उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिलेत. तर 2011 ते 2013 यादरम्यान ते एमपी राज्य पर्यटन विकास प्राधिकरणचे अध्यक्ष होते.