तू काहीही कर 'मावळ पॅटर्न' सत्यात उतरवणारच, बाळा भेगडेंनी एकेरीवर उतरत सुनील शेळकेंना ललकारलं
पक्षाच्या पदाचा राजीनामा देत या तालुक्याची संस्कृती टिकवण्यासाठी एकत्र आले आहोत.तुला जर या ठिकाणी राजकारण करायचे नसेल तर आजच अजितदादांकडे जा आणि मला माघार घ्यायची असे सांग, असे आवाहन भाजप नेते बाळा भेगडेंनी केले आहे.
पिंपरी - चिंचवड: जागावाटपाच्या मुद्यावरुन महायुतीत नाराजी पाहायला मिळत आहे. मावळ मतदारसंघात (Maval Vidhansabha Election) देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. अजित पवार गटाच्या सुनिल शेळकेंना (Sunil Shelke) पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपचे नेते बाळा भेगडेंनी महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला. आता दिलेला शब्द सत्यात उतरवून शेळकेंनी बंडखोर बापू भेगडेंना पाठिंबा द्यावा, असं खिल्ली उडवणारं आवाहन बाळा भेगडेंनी केलं. मी बापू भेगडेंचा सामना करू शकत नाही, असं शेळके माझ्याकडे बोलल्याचा दावा ही बाळा भेगडेंनी केला.
बाळा भेगडे म्हणाले, सुनील शेळके तुला खरच माझ्यावर विश्वास असेल काल तू तिथे बोलला, आज तमाम मावळच्या जनतेसमोर सांगतो माघार घे आणि बापूसाहेबांना पाठींबा दे... शब्द दिला होता आता शब्द पूर्ण कर... माझा पक्ष तर माझ्याबरोबर आहेच, परंतु देहूरोडपासून लोणावळ्यपर्यंत भाजपचा एक एक कार्यकर्ता आमच्यासाठी संघर्ष करत आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा देत या तालुक्याची संस्कृती टिकवण्यासाठी एकत्र आले आहोत.तुला जर या ठिकाणी राजकारण करायचे नसेल तर आजच अजितदादांकडे जा आणि मला माघार घ्यायची असे सांग.. त्यातच तुझे भले आहे
मावळ पॅटर्न अतिशय अतितटीचा होणार
बंडखोर बापू भेगडेंसाठी राबविण्यात येत असलेला मावळ पॅटर्न सत्यात उतरवणार, हा चंग फडणवीसांच्या भेटीनंतर ही बाळा भेगडेंनी कायम ठेवलाय. म्हणूनचं बापू भेगडेंचा अपक्ष अर्ज भरण्यासाठी बाळा भेगडे स्वतः हजर राहिले. दोन दिवसांपूर्वी सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंसह फडणवीसांची भेट घेतली, त्यानंतर शेळके आणि बाळा भेगडेंचे मनोमिलन झाले. आता फडणवीसांचा आदेश अंमलात आणून, बाळा भेगडे महायुतीचा धर्म पाळणार असा शेळकेंना ठाम विश्वास होता. मात्र काही तासांतच बाळा भेगडेंनी एकेरी उल्लेख करत शेळकेंवर हल्लाबोल केला. अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळकेंविरोधात सर्व पक्षीयांनी मोठ बांधून बापू भेगडेंना मैदानात उतरवलं आहे. लोकसभेतील सांगली पॅटर्न नंतर विधानसभेतील हा मावळ पॅटर्न अतिशय अतितटीचा होणार हे आता उघड आहे.
शरद पवार गटाचा बापू भेगडेंना पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांनी उमेदवारी दिलेल्या सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी अखेर नवा डाव टाकला आहे. मावळमध्ये तुतारीचा उमेदवार न देता, अजित पवार गटातून बंडखोरी केलेल्या बापू भेगडेंना शरद पवार गटाने ही पाठिंबा जाहीर केला आहे. एबीपी माझाने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महायुतीकडून शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याच दिवशी भाजपने बंडखोर बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती, शेळकेंना कोंडीत अडकवण्यासाठी पवारांनी सुद्धा हा नवा खेळला. सोमवारी शरद पवार गट बापू भेगडेंचा अर्ज दाखल करताना हजर राहणार आहे. स्थानिक शरद पवार गटाकडून ते जाहीर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा :