![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईत भाजपला मोठा झटका, बोरिवलीत गोपाळ शेट्टींची बंडखोरी, शिंदे गटाचा नेताही अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या शायना एन. सी. यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना मुंबादेवीतून रिंगणात उतरवण्यात आले आहे.
![Maharashtra Assembly Election 2024: मुंबईत भाजपला मोठा झटका, बोरिवलीत गोपाळ शेट्टींची बंडखोरी, शिंदे गटाचा नेताही अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार BJP gopal Shetty will file independent nomination form Borivali Vidhan Sabha maharashtra assembly election 2024 Maharashtra Assembly Election 2024: मुंबईत भाजपला मोठा झटका, बोरिवलीत गोपाळ शेट्टींची बंडखोरी, शिंदे गटाचा नेताही अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/29/562a1d2cdf7e2bdc469b0084909c14981730169104238954_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: लोकसभा निवडणुकीला उमेदवारीची संधी हुकल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या संधीकडे टक लावून बसलेले भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. गोपाळ शेट्टी हे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून (Borivali Vidhan Sabha) लढण्यासाठी आग्रही होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने धक्कातंत्राचा वापर करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशीरा आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोपाळ शेट्टी हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने भाजपमधील बंडखोरी अटळ मानली जात आहेत.
तर दुसरीकडे मुंबादेवी मतदारसंघाची जागा ही शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. याठिकाणी भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी सोमवारी रात्रीच झटपट शिवसेनेत प्रवेश केला. आता त्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर मुंबादेवीतून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे नाराज झालेले भाजप नेते अतुल शाह यांनी बंडखोरी केली आहे. ते मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यात भाजपला अपयश आल्याने मुंबईत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय, वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातही महायुतीत बंडखोरी झाली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर हे आज या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी भरणार आहेत.
मुंबादेवीत शायना एनसी यांना उमेदवारी मिळाल्याने आश्चर्याचा धक्का
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या यादीमधील भाजपच्या शायना एन.सी. यांचे नाव राजकीय वर्तुळासाठी आश्चर्याचा धक्का ठरला. शायना एन.सी. या वरळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छूक होत्या. मात्र, त्यांना मुंबादेवीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शायना एनसी यांची लढत काँग्रेसच्या अमिन पटेल यांच्या विरोधात होईल. तसचे भाजपच्या अतुल शहा यांनी माघार न घेतल्यास त्यांच्याही आव्हानाचा सामना शायना एन.सी. यांना करावा लागेल.
अकोल्यात भाजपमध्ये बंडाळी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी बंडाळी होताना दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिचंदानी आज करणार अपक्ष उमेदवारी दाखल. अकोल्यातून भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांना तिकीट दिल्याने आलिमचंदाणी होते नाराज. आलिमचंदाणी 28 वर्षांपासून पालिकेच्या राजकारणात आहेत. त्यांनी महापालिका होण्याआधी दोनदा भूषवलं अकोल्याचं नगराध्यक्षपद. आलिमचंदाणी यांच्या आधी पक्षाचे 8 वर्षे शहराध्यक्ष असलेले आणि आता प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले डॉ.अशोक ओळंबे यांनी परवा दिला होता पक्षाचा राजीनामा. ओळंबे आज 'प्रहार'कडून भरणारा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)