(Source: ECI/ABP News/ABP Majha)
1 खासदार असलेल्या मांझींना कॅबिनेट, 7 खासदार असलेल्या शिवसेनेला एकही का नाही? श्रीरंग बारणेंचा सवाल, केंद्रातील कॅबिनेटवरुन खदखद
Narendra Modi Cabinet 2024 : एनडीएमधील खदखद चव्हाट्यावर, भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी खदखद बोलून दाखवली.
Khasdar Shrirang Barne : चिराग पासवान (Chirag Paswan) यांचे पाच खासदार असताना कॅबिनेट मंत्रिपद (Narendra Modi Cabinet 2024) मिळाले, एक खासदार असणाऱ्या मांझी यांनाही कॅबिनेटमंत्रिपद मिळाले, कुमारस्वामी यांना दोन खासदार असताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, आम्हालाही कॅबिनेट मंत्रिपद मिळायला हवं होतं, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार आले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे दुजाभाव झाल्याचं सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. भाजप, जेदयु, टीडीपी यांच्यानंतर एनडीएमधील शिवसेनेला सर्वाधिक खासदार आहेत. पण तरीही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं समोर आलेय. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत उघडपणे भाष्य केलेय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असं होतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांनाही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेच भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी खदखद बोलून दाखवली.
शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं होतं -
देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ स्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करता शिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक आपेक्षा होती. चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडून आले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदार कर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमची अपेक्षा होती. कॅनिबेनट मंत्रिपदाची शपथ आमच्या खासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळाले असते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.
एनडीएमध्ये असताना ठाकरेंना भरभरुन पदे दिली जायची, एकनाथ शिंदेंसोबत दुजाभाव केला जातोय का ?
माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आले. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार असताना शिंदे साहेबांना न्यायिक भूमिका खरंतर या सगळ्या गोष्टींमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मिळेल ही अपेक्षा होती. माननीय शिंदे साहेबांकडे याबाबतीमध्ये आमची भूमिका सविस्तर मांडली आहे. भारतीय जनता पक्षाचा जुना साथी म्हणून शिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद तर मिळायलाच हवं होतं, ही आमची मागणी होती.
सर्व खदखद मुख्यमंत्र्यांनी अमित शाह आणि मोदींच्या कानावर घातली आहे का ?
मला त्या बाबतीमध्ये काय माहिती नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही स्वतः या संदर्भात सांगितलं होतं की, आपण याबाबतीमध्ये करत केंद्रीय नेतृत्वाला आपणही गोष्ट आम्ही जे भूमिका मांडली ती त्यांच्या कानी घातली पाहिजे. राज्यामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने 28 जागा राज्यामध्ये लढवल्या, त्यांना नऊ जागा मिळाल्या. शिवसेना पक्षाने 15 जागा लढवल्या, त्यांना सात जागा मिळाल्या. आज स्टाईक रेट देखील शिवसेना पक्षाचा चांगला आणि अधिक आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री होती की कॅबिनेट मंत्रिपद शिवसेना पक्षाला मिळेल. परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटतं.
चार महिन्यावर आलेल्या विधानसभेला ताकद मिळावी म्हणून मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी करु शकतात ?
राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत असताना जे घटक पक्ष महाराष्ट्रामध्ये खास करून शिवसेना असतील यांना न्यायिक भूमिका केंद्र सरकारने अथवा केंद्रीय नेतृत्वाने द्यावी, अशी आमची भूमिका आहे.
अजित पवारांना मंत्रिपद का नाही दिलं ? नेमकी काय घडामोड होती ?
खरंतर याबाबतीमध्ये मी सांगेल की माननीय अजितदादा पवार यांनी खूप मोठी भूमिका की या सगळ्या घडामोडीमध्ये भारतीय जनता पक्षासाठी घेतलेली आहे. परिवाराशी देखील एक या सगळ्या घडामोडीमध्ये रोष देखील घेतला आहे. हे मला असं वाटतंय की अजित दादाला देखील न्याय मिळाल देण्याची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने घ्यायला पाहिजे होती.
उदयनराजेंना मंत्रिपद मिळेल अशी आपेक्षा होती, पण मिळाले नाही...
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणूनच उदयनराजे यांच्याकडे पाहिलं जातं. छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. त्यामुळे उदयनराजेंचा सन्मान व्हावा ही न्याय भूमिका महाराष्ट्रातील जनतेचे निश्चितपणे आहे. छत्रपती शिवरायांच्या गादीचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मराठा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ही भूमिका आपण जी मांडली ती भूमिका न्यायिक भूमिका छत्रपतींच्या बाबतीमध्ये, परंतु भारतीय जनता पक्षाचा हा अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला संधी द्यावी? कोणाला मंत्री करावं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु आपण विचारलं तर छत्रपती उदयनराजेच्या विषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेम आहे.