महायुतीकडून सदा सरवणकर यांना मोठी ऑफर, अर्ज माघारी घेणार?; राजकीय वर्तुळात खळबळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसेकडून येथील मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबई : राज्यातील महत्वाच्या लढतींपैकी एक असलेल्या मुंबईतील (Mumbai) माहीम विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे, येथील शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर (Sada sarvankar) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील का, त्यांच्यावर बड्या नेत्यांचा दबाव आहे, तो दबाव स्वीकारून ते विधानसभेच्या रिंगणातून बाहेर पडतील का, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. मात्र, महायुतीकडून सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, अद्यापही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, सदा सरवणकर राजी होऊन विधानपरिषद स्वीकारतील का, हा प्रश्न आहे, त्याचे उत्तर पुढील 4 दिवसांत स्पष्ट होईल.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मनसेकडून येथील मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आपण ही जागा लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, मनसेनं लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने भाजपकडून अमित ठाकरेंना विधानसभेला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील झाला. तसेच, महायुती म्हणून अमित ठाकरेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र, अद्याप त्यांनी वरिष्ठ नेत्यांची ऑफर स्वीकारली नाही.
दरम्यान, महायुतीमधील जागावाटप झाल्यानंतर आता बंडखोरांना शांत करण्याचे आवाहन बड्या नेत्यांसमोर आहे. त्यात, भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मनधरणी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यामुळे, गोपाळ शेट्टी यांचीही तलवार लवकरच म्यान होईल, असे दिसून येते. मात्र, मोर्शी व मानखुर्द या दोन जागेवर मैत्रीपूर्ण लढत महायुतीमध्ये होणार असल्याचे निश्चित झालं आहे.
बाळासाहेबांचा उल्लेख करत भावनिक वक्तव्य
माहीममधील उमेदवारी मागे घेण्याबाबत सदा सरवणकर म्हणाले, मी चाळीस वर्षापासून शिवसेनचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहीमचा आमदार झालो. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मधे राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते, असं सदा सरवणकर म्हणाले.
अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे - फडणवीस
देवेंद्र फडणवीस आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भाजपचं आहे. आम्हाला लोकसभेत राज ठाकरेंनी पाठींबा दिला होता. त्यामुळे एका जागेवर ते मदत मागत असतील, तर ती द्यायला हवी, असं आमचं मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मतही वेगळं नाहीय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी स्वत: एकनाथ शिंदेंसोबत याविषयावर चर्चा केली. आम्ही चर्चा केली की एखादी जागा हवं तर अदलाबदल करु...एकनाथ शिंदेंनी प्रयत्न देखील केला. त्यावेळी तेथील उमेदवार सदा सरवणकर यांनाही बोलावलं होतं. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी मत मांडली की, आपण जर जागा लढवली नाही, तर ती मत थेट ठाकरे गटाला जातील. मात्र आमचं आजही मत आहे, अमित ठाकरेंना मदत करायला हवी, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
हेही वाचा
अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं फार वेदनादायी; शरद पवारांच्या नक्कलवर बोलले अमोल मिटकरी