Amit Thackeray Vs Sada sarvankar: अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी मोठी गोष्ट; सदा सरवणकरांचा 'राजपुत्रा'वर बोचरा वार
Amit Thackeray Vs Sada sarvankar: माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात सदा सरवणकर यांनी माघार घ्यायला नकार दिला होता.
मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचे डिपॉझिट वाचले तरी खूप मोठी गोष्ट आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केली आहे. या निवडणुकीत भाजप आमच्यासोबत आहे. भाजपचे पदाधिकारी आमच्यासाठी काम करतील, अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासाठी नव्हे, असेही सरवणकर यांनी म्हटले. सदा सरवणकर (sada sarvankar) यांनी रविवारी माहीम मतदारसंघात (Mahim Vidhan Sabha constituency) रॅली काढली होती. ही रॅली शिवसेना भवनासमोरुनही गेली. यावेळी सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांना डिवचले. यावर आता अमित ठाकरे आणि मनसेचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर (Priya Sarvankar) यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले होते. हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे प्रिया सरवणकर यांनी माहीमधील आजच्या रॅलीचे नेतृत्व केले. यावेळी प्रिया सरवणकर यांनी म्हटले की, माहीमचा मुस्लीम समुदाय आमच्यासोबत आहे. अमित ठाकरे यांना यंदा मनसेकडून लाँच करण्यात आले आहे. लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. माहीम विधानसभेत मुस्लीम समुदाय महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadhi) नाही. हा समुदाय सदा सरवणकर यांच्या बाजूने असल्याचा दावा प्रिया सरवणकर यांनी केला.
माहीमचा मु्स्लीम समाज आमच्या पाठिशी; ठाकरेंच्या उमेदवाराचा दावा
माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे Vs ठाकरे गटाचे महेश सावंत Vs शिंदे गटाचे सदा सरवणकर अशी तिहेरी लढत होत आहे. महेश सावंत यांनी माहीमचा मुस्लीम समाज आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला. ते शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांचा स्मृतिदिन जो आमच्यासाठी काळा दिवस आहे. साहेब आमच्या हृदयात कोरले आहेत. आम्ही शिवाजी पार्कमध्ये दिवस रात्रभर बसतो. बाळासाहेबांना नतमस्तक होऊन आमच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळी चालताना पाया पडूनच सुरुवात करतो. माझा प्रचार चांगला सुरु आहे. माहीम मतदारसंघातील कुंभार, भंडारी आणि मुस्लीम समाजाने (Muslim Community) मला पाठिंबा दर्शविला आहे, असे महेश सावंत यांनी म्हटले.
आणखी वाचा
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण