Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत.

Maharashtra Zilla Parishad Election 2026: नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा धुरळ आजपासून (16 जानेवारी) उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे शहरी भागातील निवडणुका संपताच ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक?
राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आज 16 जानेवारीपासून सुरू होऊन 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होईल, तर 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे अधिक वेळ देण्याची विनंती केली होती. आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिली असून 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आयोगावर बंधनकारक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या




















