ज्यांचे सरकारच येणार नाही, ते 3000 काय 5000 देऊ असंही सांगतील, छगन भुजबळांचा महाविकास आघाडीला टोला
महाविकास आघाडीनं सत्तेत आल्यावर महिलांना 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन मंत्री ढगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
Chhagan Bhujbal: लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) बंद करावी म्हणून महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) लोक हाय कोर्टात गेले आहेत. या योजनेमुळं राज्याचे नुकसान होणार, राज्य बुडणार आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. 1500 रुपयांमुळे राज्य बुडत होते अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र, आता महाविकास आघाडीनं सत्तेत आल्यावर महिलांना 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मग आता 3000 रुपये दिल्यामुळं काय होणार? असा सवाल मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.
विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केल्याचे पाहायला मिळाले. या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, पैसे परस्पर काढले जातील, अशीही टीका विरोधकांनी केल्याचे भुजबळ म्हणाले. 1500 रुपयांमुळे राज्य बुडत होते अशी टीका विरोधकांनी केली. होती. मग आता 3 हजार रुपयांमुळं काय होणार आहे असा सवाल भुजबळ यांनी केला. ज्यांचे सरकारच येणार नाही, त्यांना सांगायला काय जातंय असा टोला देखील भुजबळ यांनी महाविकास आघाडीला लगावला. ते पाच हजार रुपये महिन्याला देवू असेही सांगतील, काहीही सांगतील असेही भुजबळ म्हणाले.
महायुती सरकारने प्रत्यक्ष कामे केली फक्त आश्वासने दिली नाहीत
महायुती सरकारने प्रत्यक्ष कामे केली आहेत. फक्त आश्वासन दिलेली नाहीत असेही भुजबळ म्हणाले. वृद्धांची पेन्शन, आशा सेविकेंचे मानधन वाढवणार आहोत असे भुजबळ म्हणाले. शेतकऱ्यांना 12 हजार मिळतात त्यांनाही 3000 हजार वाढवून 15000 हजार देणार आहोत असे भुजबळ म्हणाले. तसेच लाडक्या बहिणींना आता 1500 देतोय नंतर 2100 रुपये देणार असल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व योजनांमध्ये हळूहळू वाढ करणार असल्याची माहिती देखील भुजबळ यांनी दिली.
निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला महिलांच्या समस्या ठावूक आहेत. त्यामुळेच आम्ही महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्याचे ठरवले, असा दावा सत्ताधारी करत आहेत. आम्ही सत्तेत आल्यास या आर्थिक मदतीत वाढ करू असं आश्वासनही महायुतीने दिलं आहे. सरकार आल्यावर आम्ही 2100 रुपये देऊ असे महायुतीनं जाहीर केलं आहे. तर महाविकास आघाडीनं सत्तेत आल्यावर 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता महिला मतदारांचे महत्त्व ओळखून विरोधी बाकावरील महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीनेदेखील महिलांना मोठ्या आर्थिक मदतीचं आश्वासनं दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या: