लाडक्या बहिणींना पैसेच पैसे, महायुती 2100, मविआ 3000 तर वंचित देणार 3500 रुपये, कोणी नेमकं काय आश्वासन दिलं?
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. अनेक राजकीय पक्षांनी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भरघोस आश्वासनं दिली आहेत.
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. आम्हाला महिलांच्या समस्या ठावूक आहेत. त्यामुळेच आम्ही महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्याचे ठरवले, असा दावा सत्ताधारी करत आहेत. आम्ही सत्तेत आल्यास या आर्थिक मदतीत वाढ करू असं आश्वासनही महायुतीने दिलं आहे. दरम्यान, आता महिला मतदारांचे महत्त्व ओळखून विरोधी बाकावरील महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीनेदेखील महिलांना मोठ्या आर्थिक मदतीचं आश्वासनं दिलं आहे.
महिलांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनं
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडी या पक्षाने राज्यातील महिलांना प्रतिमहिना भरघोस आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महिला मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही आश्वासनं दिली जात आहेत.
विधानसभा निवडणुकआधी योजनेची सुरुवात
सत्ताधारी महायुती सरकारने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यापासून राज्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात झालेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील आचारसंहिता लक्षात घेता महायुतीने महिलांना ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून ही योजना जास्त काळ टिकणार नाही, असा दावा केला जात आहे. महिला मतदारांना लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून आकर्षित करण्यात येत आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
कोणत्या पक्षाने महिलांना किती रुपये देण्याचे आश्वासन दिले?
महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये दिले जातात. आम्ही सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाईल, असं महायुतीने म्हटलंय. तर लाडकी बहीण योजनेला पर्याय म्हणून विरोधकांनी महालक्ष्मी योजना आणली आहे. आम्ही सत्तेत आल्यास ही योजना लागू करू. तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रतिमहिना 3000 रुपयांची मदत करू, असं महाविकास आघाडीने आश्वासन दिलेलं आहे. महिला मतदारांचं महत्त्व ओळखून वंचित बहुजन आघाडीनेदेखील महिलांना आर्थिक मदतीचं आश्वासन दिलेलं आहे. आम्ही सत्तेत आल्यास महिलांना प्रतिमहा 3500 रुपये देऊ, असं वंचितने म्हटलंय.
त्यामुळे महिला नेमकं कोणाच्या पारड्यात मतं टाकणार? आणि सत्तेत आल्यास दिलेल्या आश्वासनांप्रमाणे महिलांना आर्थिक मदत मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
अमित ठाकरेंना काकांकडून खरंच छुपी मदत? उद्धव ठाकरेंकडून एक घाव दोन तुकडे; थेट सांगूनच टाकलं!