विजयराज शिंदे ही चिल्लर केस, त्याच्या बापात दम असेल तर त्याने निवडणूक लढावीच; संजय गायकवाडांचं ओपन चॅलेंज
विजयराज शिंदे ही चिल्लर केस आहे. त्याच्या बापात दम असेल तर त्याने निवडणूक लढावीच असं ओपन चॅलेंज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलं आहे.
Sanjay Gaikwad on Vijayraj Shinde Buldhana : बुलढाण्यात महायुतीतील बंडखोरीचा वाद मिटता मिटेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी महायुतीत बंडखोरी केली आहे. विजयराज शिंदे ही चिल्लर केस आहे. त्याच्या बापात दम असेल तर त्याने निवडणूक लढावीच असं ओपन चॅलेंज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलं आहे. त्यामुळं आता राजकीय वातावरण गरम झालं आहे.
बुलढाण्यात आता बंडखोरीचा वाद उफाळला
काही वेळापूर्वी महायुतीचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करण्याचे अनेक मुद्दे समोर आणले होते. त्यामुळं त्यांनी बंडखोरी केल्याचेही सांगितलं होतं. काही वेळातच शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना प्रति आव्हान देत शिंदे हा चिल्लर माणूस असून त्याच्या बापात हिम्मत असेल तर त्याने निवडणूक लढवावीच....! असं प्रति आव्हान केलं आहे. त्यामुळे बुलढाण्यात आता बंडखोरीचा वाद मोठ्या प्रमाणात उफाळल्याच दिसत आहे.
विजयराज शिंदेंचे आरोप काय?
भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण का बंडखोरी करतोय याची धक्कादायक कारणेही त्यानी सांगितली आहेत. मी बंडखोरी केली नाही. मी पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितली आहे. मला आशा आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मला लवकर परवानगी देतीलच. शिवसेनेच्या उमेदवाराने गेल्या पाच वर्षात आमच्या भाजपाच्या गाव पातळीपासून देशपातळीवरील नेत्यांना अपमानित केलं आहे. आमचे ऋषितुल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या या उमेदवाराने शिवी देत अपमानीत केल्याचे शिंदे म्हणाले होते. तसेच आमचे आमदार संजय कुटे याना आईवरून शिवीगाळ करून अवमानित केलं. आमचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर याना अपमानित केलं. माझ्यासह अनेकांवर जीवघेणे हल्ले या शिंदे गटाच्या उमेदवाराने केले. या सर्व कारणाने मी त्याच्या विरुद्ध लढून या मतदार संघातील भाजपची ताकद दाखविणार आहे. असे म्हणत भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शड्डू ठोकला आहे.
विजयराज शिंदे यांना मुख्यमंत्र्यांकडून चर्चेच आवाहन
भाजपाला सातत्याने अवमानित करणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवाराला आम्ही ताकद दाखवू. तसेच आमच्या भाजप पक्षाला, भाजप मतदारांना, कार्यकर्त्यांना सन्मानित करणार आहे. असेही ते म्हणाले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचं निमंत्रण आले आहे. अशी माहिती स्वत: विजयराज शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: