Sunil Shelke: सुनील शेळके-बापू भेगडे प्रचारावेळी आमने-सामने; कार्यकर्तेही आपापसात भिडले, शेळकेंवर दुसरा गुन्हा दाखल
Sunil Shelke: विधानसभा निवडणुकीच्या काळात शेळकेंवर हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. मावळ पॅटर्नमुळं डोकेदुखी वाढलेल्या शेळकेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत.
पुणे: निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचं दिसून आलं. लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके आणि मावळ पॅटर्नचे अपक्ष उमेदवार बापू भेगडेंचा प्रचारावेळी आमना-सामना झाल्याचं दिसून आलं. यावेळी दोघांचे समर्थकांमध्ये घोषणाबाजीवरून जुंपल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर भेगडे आणि शेळकेंमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. भेगडे समर्थकांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. त्यानंतर लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये शेळकेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी रात्री दहा नंतर ही शेळकेंनी प्रचार केल्याप्रकरणी शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात शेळकेंवर हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. मावळ पॅटर्नमुळं डोकेदुखी वाढलेल्या शेळकेंच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत.
आधी सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आयोगाच्या नियमानुसार दहा वाजता प्रचार थांबवणं गरजेचं असताना ही शेळकेंनी आढले खुर्द गावात रात्री 11 पर्यंत सभा सुरुचं ठेवली. शेळके यावर ही थांबले नाहीत तर पुढं चांदखेड गावात रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी शेळकेंच्या प्रचार रॅलीसमोर फटाके ही फोडण्यात आले. या दोन्ही बाबी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. त्यामुळं महायुतीतील सत्ताधारी आमदार सुनील शेळकेंनी कायदा हातात घेतल्याचं यातून दिसून आलं. आयोजक म्हणून नामदेव दाभाडे वर ही हा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
नेमकं काय आहे प्रकरण?
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दहा वाजता प्रचार थांबवणं गरजेचं असताना ही सुनील शेळकेंनी आपला प्रचार सुरूच ठेवला. मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार, आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ दाभाडे यांनी मंगळवारी (5 नोव्हेंबर) रोजी शिरगाव हद्दीतील आढले खुर्द व चांदखेड गावांमध्ये प्रचार करण्यात आला. त्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व अटीनुसार प्रचार फेरीला परवानगी दिली होती. परंतु, ही फेरी रात्री दहा वाजल्यानंतर काढण्यात आली. रात्री दहानंतर प्रचार करण्यास बंदी असताना देखील प्रचार फेरी काढण्यात आली. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत सुनील शेळकेंची प्रचार फेरी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी निवडणूक विभागाचे कर्मचारी दीपक भाऊराव राक्षे (वय 53, रा. सोमाटणे फाटा) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (वय 45) यांच्यासह नामदेव सावळेराम दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.