नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न; मुंबईतील बैठकीत मविआच्या नेत्यांचा पाच तास काथ्याकूट, पण निर्णय नाहीच
दीर्घकाळ सुरू असलेल्या बैठकीत इतर पक्षांशी देखील चर्चा झाल्या. कोणत्या पक्षाने किती आणि कोणत्या जागा लढवल्या यावर देखील शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा (Maha Vikas Aghadi ) तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जागावाटपावरून निर्माण झालेला वाद शमल्यानंतर महाविकास आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ रात्री उशीरापर्यंत सुरू होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या मुंबईमधल्या जागावाटपाचा फाॅर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसला 105, ठाकरे गटाला 95, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 84 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईला यश आले आहे.
महाविकासआघाडीच्या जागावटपाची अधिकृत घोषणा आज पत्रकार परिषदेत केली जाणार आहे. बैठकीत आघाडीसोबत असलेले डावे पक्ष, समाजवादी पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांना तिन्ही पक्षांनी आपआपल्या कोट्यातून जागा सोडाव्यात, असा निर्णय घेण्यात आला. दीर्घकाळ सुरू असलेल्या बैठकीत इतर पक्षांशी देखील चर्चा झाल्या. कोणत्या पक्षाने किती आणि कोणत्या जागा लढवल्या यावर देखील शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
अनिल देसाई आणि संजय राऊत बैठक मध्येच सोडून गेले
महाविकास आघाडीची मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीत जागा वाचपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जवळपास साडेपाच तासानंतर तोडगा निघाला. मंगळवारी संध्याकाळी 6.30 वाजता सुरू झालेली बैठक अखेर रात्री 12 वाजता संपली. मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि संजय राऊत उपस्थित होते. मात्र संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी अर्ध्यात रात्री 10 वाजता मिटींग सोडून निघाले. बैठकीतून जातान त्यांनी महाविकास आघाडीत सर्व ठीक आहे. लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. देसाई आणि राऊत गेल्यानंतरही बैठक दोन तास चालली. ठाकरे गटाचे नेते नाराज असल्याने मध्येच गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
मुंबईच्या जागेचा तिढा सुटला?
तसेच मविआच्या या बैठकीत मुंबईच्या जागेचा देखील तिढा सुटला आहे. मुंबईत विधानसभेचे एकूण 36 मतदारसंघ असून, त्यापैकी सर्वाधिक 18 जागा या ठाकरेंची शिवसेना लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस 14 जागा, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीनं छोट्या मित्रपक्षांनाही काही जागा सोडल्याची माहिती आहे. त्यानुसार समाजवादी पार्टीला एक, आम आदमी पक्षाला एक जागा सोडण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबईतल्या वर्सोवा, भायखळा आणि वांद्रे पूर्व या तीन जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधला तिढा अद्याप सुटत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हे ही वाचा :