Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात चाकरमान्यांचं मतदान उमेदवारांचं भवितव्य ठरवणार; यंदा विधानसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 15 जागा आहेत. पैकी 8 जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात चाकरमानी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) कुणाच्या पारड्यात मतं टाकणार? चाकरमान्यांची मतं कुणासाठी तारक आणि मारक? अशी चर्चा सुरू झालीय. कारण, चाकरमानी हा सामाजिक, राजकीय क्षेत्रासह सर्वच ठिकाणी महत्वाची भूमिका बजावत असतो. राजकारण असेल किंवा गावचे निर्णय यामध्ये त्याचं म्हणणं निर्णायक असते. किंबहूना त्याच्या बोलण्याला मान-सन्मान असतो. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या अटीतटीच्या लढतीत चाकरमान्यांची मतं ही उमेदवाराची राजकीय भवितव्य ठरवणारी असणार आहे. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी चाकरमान्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
शहरांमधील धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात जगणारा, अगदी श्वास घेताना देखील वेळ काटेकोरपणे पाळणारा हाच चाकरमानी कोकणातील राजकारण्यांचं राजकीय प्रवासाचं भवितव्य ठरवणार आहे. कारण, मोठ्या शहरांमध्ये नोकरी-धंद्यानिमित्त असलेला चाकरमानी आपल्या मुळ गावी मात्र सर्वच क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत हुकमाचा एक्का असतो. त्यामुळे हाच एक्का आता राजकारणातील, त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील बादशाह कोण? याचा निर्णय लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
नेमका फायदा कुणाला होणार?
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 15 जागा आहेत. पैकी 8 जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी सरळ लढत आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट 4 जागा, शिंदे गट 3 जागा, भाजप 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 जागा लढवत आहे. तर, शेकापनं 4 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पैकी चार जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत आहे. तर एका जागेवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने - सामने आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार उभे असून एका जागेवर भाजपनं उमेदवार दिला आहे. त्यामुळे नेमका फायदा कुणाला होणार? चाकरमान्यांची मतं कुणाच्या पारड्यात पडणार? यासाठी आता सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत, असं दैनिक रत्नागिरी टाईम्सचे वरिष्ठ पत्रकार किशोर मोरे यांनी सांगितले.
चाकरमान्यांचं मतदान हे उमेदवारांचं भवितव्य ठरवणार-
रायगड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे जवळपास 15 ते 16 टक्के चाकरमानी आहेत. त्याखालोखाल रत्नागिरी जिल्ह्यात 8 ते 10 टक्के तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान 5 ते 7 टक्के चाकरमानी हे मतदानाचा हक्क बजावतात. त्यामुळे सध्या सर्वच उमेदवारांनी चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. हाच चाकरमानी गावी यावी यावा यासाठी सर्वच पक्षीय उमेदवार आणि पक्षानं मुंबई, ठाणे, कल्याणसह, वसई विरार, नालासोपारा या मुंबई शहराच्या आसपासच्या भागामध्ये बैठकांचं आयोजन केले. गावच्या विकासासाठी काय केले जाईल? यासाठी आश्वासनांची खैरात केलीय. शिवाय, चाकरमान्यांना मुंबई किंवा इतर शहरांमधून गावी मतदानाला आणणे. त्यांना परत सोडण्यासाठी गाड्यांची देखील खास सोय केलीय. त्यामुळे कोकणातील विधानसभा निवडणूक चाकरमान्यांचं महत्त्व अधोरेखित होतंय. राज्यभरात एकाच दिवशी मतदान होतंय. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याणसह कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारं चाकरमान्यांचं मतदान हे उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे. कारण, याच चाकरमान्यांच्या हातात अटीतटीच्या लढाईत उमेदवारांच्या राजकीय भवितव्याची दोरी असणार आहे, असं साप्ताहिक खबरदार हेमंत वणजू यांनी सांगितले.