जयंत पाटलांना पाडणं एवढं सोपं नाही, अजून बारामतीत गेलो नाही, जयंत पाटलांचं अजितदादांना थेट आव्हान!
Jayant Patil Criticizes Ajit Pawar: जयंत पाटील आणि अजित पवार एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. पुण्यात जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर बोलताना जोरदार फटकेबाजी केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आपले उमेदवार विजयी व्हावेत यासाठी प्रचारसभा घेत आहेत. या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. एका नेत्याने केलेल्या टीकेला दुसरा नेता तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देत आहे. यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील मागे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसतायत. दरम्यान, यावरच आता जयंत पाटील यांनी भाष्य करत अजित पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे हे सरळमार्गी, चांगल्या पद्धतीने काम करणारे नेते
अजित पवार पुण्यात एका प्रचार सभेला आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राजकारणात चिखल झाला आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. याबाबत विचारले असता. राज ठाकरे असं नेमकं का म्हणत आहेत, याबाबत मला माहिती नाही. पण उद्धव ठाकरे हे सरळमार्गी, स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांच्याविषयी महाराष्ट्रात नितांत आदर आहे. राज ठाकरे कोणत्या संदर्भाने बोलत आहेत, हे तपासलं पाहिजे.
राज ठाकरेंच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं ठरवलं पाहिजे
राज ठाकरे यांनी पुण्यातील कोथरुड येथील एका सभेत खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांच्यामुळे राजकारणात चिखल झाला. त्यावर बोलताना, राज ठाकरे हे गेल्या बऱ्याच वर्षांपासून तेच-तेच बोलत आहेत. त्यांच्या या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. गेल्या दहा वर्षांपासून ते हेच विधान करतायत, असं प्रत्युत्तर दिलंय.
त्यांनी अगोदर कोयता गँगाचा बंदोबस्त करावा नंतर...
अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील एका प्रचारसभेत जोरदार भाषण केले होते. या भाषणात त्यांनी थेट जयंत पाटलांना लक्ष्य केलं होतं. जयंत पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात एक पोलीस ठाणंही बांधता आलं नाही, अशी टीका केली होती. त्यावर बोलताना माझ्या मतदारसंघातील पोलीस ठाणे अतिशय चांगल्या इमारतीत आहे. ती इमारत फार चांगली आहे. माझ्या मतदारसंघात गुन्हेगारी कमी झाली आहे. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. ते पालकमंत्री असताना पुण्यात किती गुन्हे झाले. त्यांनी अगोदर कोयता गँगाचा बंदोबस्त करावा नंतर त्यांनी माझ्यावर बोलावे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
जयंत पाटील यांना हरवणं तेवढं सोपं नाही
अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या मतदारसंघात घेतलेल्या सभेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. जयंत पाटील यांना पडण्यासाठी अजित पवार पवार पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत, असं म्हटलं जात आहे. यावर बोलताना, जयंत पाटील यांना पाडणं एवढं सोपं नाही. मी आणखी बारामतीमध्ये गेलेलो नाही, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.
हेही वाचा :