Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
शाहूवाडी मतदारसंघातून आमदार विनय कोरे उमेदवार असतील. हातकणंगलेमधून दलित मित्र अशोकराव माने रिंगणात असतील. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिंदे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
Kolhapur District Assembly Constituency : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले विधानसभा आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये शिंदे गटाकडूनही भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता या दोन्ही जागा महायुतीकडून मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचा पेच अखेर सुटला आहे.
हातकणंगलेमधून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दलितमित्र अशोकराव माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शाहू आघाडी या त्यांच्याच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना आता महायुतीकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनसुराज पक्षाच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. शाहूवाडी मतदारसंघातून आमदार विनय कोरे उमेदवार असतील. हातकणंगलेमधून दलित मित्र अशोकराव माने रिंगणात असतील. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिंदे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या पाठिंबाच्या बदल्यात त्यांना आता परतफेड करण्यात आली आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील लढतींचे चित्र स्पष्ट झालं आहे. हातकलंगलेमध्ये अशोकराव माने यांचा मुकाबला विद्यमान आमदार काँग्रेसचे राजू बाबा आवळे यांच्याशी असेल. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा मुकाबला काँग्रेसचे गणपतराव पाटील यांच्याशी असेल. या ठिकाणी स्वाभिमानीचा उमेदवार सुद्धा येण्याची शक्यता आहे. माजी आमदार उल्हास पाटील हे स्वगृही परतण्याची शक्यता असून त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिरोळमध्ये तिरंगी लढत अपेक्षित असून हातकणंगलेमध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर हे कोणती भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस बाकी असताना पेच सुटला आहे. दुसरीकडे करवीर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून संताजी घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथून शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवारी संदर्भात विनय कोरे यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाणार याकडे सुद्धा लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या