Ajit Pawar: 'मी साहेबांना सोडलं नाही...', भाजपसोबत जाण्याची वेळ का आली? अजित पवारांनी खरं सांगितलं कारण
Ajit Pawar: भाजपसोबत जाण्याची वेळ का आली? याबाबतचं कारण अजित पवारांनी आज गावभेट दौऱ्यादरम्यान सांगितलं आहे. नेमकं काय म्हणालेत वाचा सविस्तर.
बारामती: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपुर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांसोबत भाजप-शिवसेना यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्षाच फूट पडली. पक्षाचे दोन गट पडले. त्यानंतर अनेकदा त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी अनेकदा विकासासाठी आम्ही सत्तेत गेलो असं सांगितलं आहे. मात्र, आज पहिल्यांदा अजित पवारांनी याबाबत सविस्तर भाष्य करताना म्हणाले, 'लोकांना वाटत होतं की, मी शरद पवार साहेबांना मी सोडायला नको होतं. परंतु मी साहेबांना सोडलं नाही. सर्व आमदारांच्या सह्या होत्या, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
प्रचाराला काही काही तास शिल्लक आहेत, अशात अजित पवार बारामती मतदारसंघात गावभेट दौरे, प्रचार, सभा घेत आहेत, प्रचारावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'तुम्हाला वाटत असेल की, या वयात अजित पवारांनी शरद पवार साहेबांना आता सोडायला नको होतं. मी साहेबांना सोडलं नाही. मी साहेबांना सांगत होतो, सर्व आमदारांचं मत होतं. सर्वांच्या सह्या त्यावर आहेत. सर्वाचं मत होतं, सरकारमध्ये जावं. कारण कामाला स्टे आला होता. आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला. हा ताप झाला. लोकं मला वेड्यात काढतील असं मला वाटायला लागलं. स्टे मी नव्हता दिला सरकारने दिला होता. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होते, आता वेळ जाऊन चालत नाही,' असं ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
'5 वर्षांतील अडीच वर्ष माझी वाया गेली. तरी मी बारामती तालुक्यासाठी 9 हजार कोटी रुपये आणले. मी खोटं बोलणार नाही. आता पण साडेतीनशे कोटींचा सासवड आणि भिगवणचा रस्ता मंजूर केला आहे. त्याचा मोठा फायदा गावकऱ्यांना होईल. मी अर्थमंत्री असल्यामुळे मी बारामतीकरांना निधी देऊ शकतो. माझ्याकडे साडेसहा लाख कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यातून मला हजार कोटी रुपये काढणं काही अवघड नाही. निवडणूक आली म्हणून मी थापा मारत नाही', असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही...
परवा शरद पवार साहेब म्हणाले की, मी तीस वर्षे काम केलं, आता पुढच्या पिढीला संधी द्या. मला तर काय कळतच नाही, पवारांशिवाय दुसरा कोणी हाय का नाय ? बाकीच्यांनी काय करावं? गोट्या खेळाव्यात का ? सगळं एकाच घरात. ज्याला संधी मिळते त्याच्यात कर्तृत्व गाजवण्याची धमक असावी लागते, याचा माळेगावकरांनी विचार करावा, असे अजित पवार यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान म्हटलं आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं की, दीड वर्षानंतर मी आता राज्यसभा वगैरे जाणार नाही यापासून बाजूला राहणार. पण यानंतर बारामती तालुक्याला कोण पुढे नेईल ? एवढं जर समजलं तर माळेगावकरांना विनंती आहे. साहेबांना पाहुन सुप्रियाला मतदान केलं, आता मला विधानसभेला मतदान करा, असे आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.