Maharashtra Election 2024: 25 वर्षानंतर प्रथमच एकत्रित निवडणुका, यंत्रणेवर मतदारांचा विश्वास; नांदेडकरांचे भरघोस मतदान, 'ही' कारणे ठरेली लक्षवेधी
नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभेत मतदानाचा वेगळा पॅटर्न दिसलाय. असाच पॅटर्न पोस्टल मतांच्या बाबतीतही दिसून आला आहे. यंत्रणेवर मतदारांनी विश्वास दर्शवत भरघोस मतदान केलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 नांदेड : निवडणुकीनंतर निकालाचे आणि त्याच्या पडसादाचे कवित्व सुरू असते. ते जसे मतदारांमध्ये असते तसेच शासकीय यंत्रणेमध्ये देखील असते. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्यात. एकाच वेळी दोन टोकाचे दोन निकाल दोन वेगवेगळ्या निवडणुकीत लागले. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना व त्यावरील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे प्रशासनाने देखील जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहे.
नांदेडकरांनी विधानसभेत पूर्ण एका पक्षाला तर लोकसभेत दुसऱ्या पक्षाला निवडून दिले आहे. अनेक ठिकाणी जवळच्या लढती झाल्या आहेत. मात्र यामध्ये एकूणच सामान्य माणसाला यंत्रणेवरचा, इव्हीएमवरचा विश्वास ठेवायला प्रत्यक्ष घटनाक्रम उपलब्ध झाला आहे. संपूर्ण पारदर्शीतेत प्रक्रिया पार पडली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही तक्रार नाही. संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया जनतेपुढे आली आहे.
एकही तक्रार नाही
लोकसभा व विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रशासनामध्ये मतदार यादी संदर्भात एकही तक्रार आलेली नाही. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ उलटून गेल्यावर 6 वाजेपूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांचे मतदान पूर्ण करून घेण्यात आले. यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तसेच मतदान केंद्र रचना इत्यादी बाबत कोणीही कोणताही आक्षेप नोंदविला नाही. लोकसभा निवडणूक अटीतटीची झाली. मात्र या ठिकाणी देखील सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली.
25 वर्षानंतर एकत्रित निवडणुका
या निवडणुकीत काही घटनाक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहेत. एक म्हणजे 25 वर्षानंतर जिल्ह्यातील नागरिकांना एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेला मतदान करता आले.पहिले तीन टेबल झाले की लोकसभेची स्वतंत्र ईव्हीएम.त्यानंतर पुन्हा एक टेबल व त्यापुढे विधानसभेची स्वतंत्र ईव्हीएम. लोकसभा व विधानसभेसाठी स्वतंत्र ईव्हीएम वर मतदान घेणे ऐतिहासिक ठरले आहे. त्यामुळे नागरिकांना एकदा शाई लावून दोन वेळा मतदानाचा अधिकार मिळाला. सहा मतदार संघात ज्या ठिकाणी लोकसभा व विधानसभा एकाच वेळी होती, त्या ठिकाणी अवघ्या काही मतदान केंद्रावर मोजक्या लोकांनी एका निवडणुकीला मतदान करून दुसऱ्या निवडणुकीसाठी मतदान देण्यास नकार दिला.अशा मतदानास नकार दिलेल्या मतदारांची नोंद मतदार नोंदवही मध्ये घेण्यात आली. यामुळे लोकसभेसाठी झालेले मतदान व लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या विधानसभा क्षेत्रातील एकूण मतदानात पंधरा मतांचा फरक नोंदविण्यात आला आहे.
आंध्रप्रदेशातील तिरुपतीची 'रिप्लिका'
नांदेड मध्ये लोकसभा व विधानसभेत मतदानाचा वेगळा पॅटर्न दिसला. असाच पॅटर्न पोस्टल मतांच्या बाबतीतही दिसून आला. 6 विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळून 4835 मते मिळाली. भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुती उमेदवारांना या सहा विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी एकूण मिळून 7446 पोस्टल मते मिळाली. याउलट लोकसभेत काँग्रेसला 8524 तर भाजपाला 6410 पोस्टल मते मिळाली. EVM प्रमाणेच पोस्टल मतांमध्येही नांदेडकरांनी वेगळा पॅटर्न चालवला.
नांदेड जिल्ह्यामध्ये जे झाले असाच प्रकार गेल्या वेळी आंध्र प्रदेशामध्ये झाला आहे. आंध्रप्रदेश मध्ये एकाच वेळी विधानसभा व लोकसभेसाठी निवडणूक झाल्या. आंध्रप्रदेश मधील तिरुपती जिल्ह्यात गेल्यावेळी खासदार वायएसआरसीपी पक्षाचा निवडून आला.तर सात आमदार तेलगू देशम भाजप व जनसेवा अर्थात NDA चे निवडून आले.असाच प्रकार यावेळी नांदेड येथे घडला आहे.
मतदानाची टक्केवारी वाढली
या निवडणुकीत अनेक गोष्टी लक्षवेधी ठरल्या.त्यापैकी एक म्हणजे जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली.गेल्यावेळी लोकसभेमध्ये 61 टक्के मतदान झाले होते. आता ही टक्केवारी लोकसभेसाठी 67.81% तर विधानसभेसाठी 69.45 टक्के झाली. खर म्हणजे यासाठी जनतेचे प्रशासनाने आभार मानले आहे.ज्या ३० टक्के नागरिकांनी लोकशाहीतील आपले कर्तव्य पूर्ण केले नाही त्यांनी देखील यापुढे चुकलेले,चुकून राहिलेले, चूक झाल्याने राहिलेले मतदान पुढच्या वेळेस चुकूनही राहणार नाही, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. घरोघरी बीएलओनी पोहोचलेल्या निवडणूक माहिती चिठ्ठ्या, मतदान केंद्र मतदान संख्या ओळखणारे विविध अॅप, प्रचार प्रसारासाठी राबविण्यात आलेली स्वीप ऍक्टिव्हिटी. प्रसार माध्यमांनी केलेली जनजागृती यामुळे ही संख्या वाढली आहे . मतदान हे किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचे महत्त्व जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे हे देखील या निवडणुकीत जिल्ह्यात लागलेल्या निकालांनी स्पष्ट केले आहे. अनेक ठिकाणी काही हजारांनी काही शेकड्यांनी उमेदवारांना पराभव बघावा लागला.
पोस्टल मतांबद्दल जागरूकता
या निवडणुकीत पोस्टल मताला देखील खूप महत्त्व आले. आपले पोस्टल मत बरोबर पडावे, यासाठी कर्मचारी जाणीव ठेवून मतदान करायला लागले. त्यासाठी प्रयत्न करायला लागले.आपले कागदपत्र योग्य पद्धतीने द्यायला लागले. पोस्टल मताला किती महत्त्व आहे हे प्रतिस्पर्ध्याला पाच लाखावर मत मिळालेल्या तरीही पराभूत झालेल्या उमेदवाराला आणि जिंकलेल्या उमेदवारालाच माहिती.जिल्ह्यात पोस्टल मताने लोकसभेची जागा निर्णायक ठरली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देखील आता पोस्टल मते आणि त्यासाठी स्वतः घ्यायची काळजी व यंत्रणेने देखील त्याचे महत्त्व लक्षात घेणे. या निवडणुकीने अधोरेखित केले आहे.