Maha Vikas Aghadi Seat Distribution : महायुतीच्या जागावाटपावर मोठी अपडेट, मुख्यमंत्री थेट दिल्लीत जाणार; आता पुढची चर्चा राजधानीतच!
महायुतीच्या घटकपक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी अद्याप काही जागांवरील पेच कायम आहे. त्यावरच आज दिल्लीत चर्चा होणार आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज भरण्यास आता सुरुवात झाली आहे. इच्छुकांना येत्या 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मोजकेच दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता महायुतीमध्ये जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सध्या महायुतीतील बहुसंख्य जागांचा प्रश्न मार्गी लागेलेला आहे. मोजक्याच जागांचा प्रश्न शिल्लक आहे. त्यामुळे आता उर्वरित जागांवर तोगडा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या उर्वरित जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत.
उर्वरित जागांवर दिल्लीतच चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच दिल्लीला जाणार आहेत. मुंबईहून ते प्रस्थान करणार आहेत. दिल्लीला गेल्यानंतर ते भाजपाच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांशी जागावाटपावर चर्चा करणार आहेत. ज्या जागांवर सध्या वाद चालू आहे, त्यावर या चर्चेत तोडगा काढला जाणार आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महायुतीच्या उर्वरित जागांवर आज दिल्लीतच चर्चा होणार असून आजच जागावाटपाचा मुद्दा निकाली लावला जाणार आहे.
तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर
महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. सर्वप्रथम भाजपाने आपली यादी सार्वजनिक केली. या यादीत एकूण 99 जागांसाठी उमेदवार देण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण 45 नावे आहेत. तर 23 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 38 उमेदवार आहेत. उर्वरित जागांसाठी हे पक्ष लवकरच आपली दुसरी यादी जाहीर करतील.
महाविकास आघाडीतही जागावाटपावर खल
दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावर खल चालू आहे. सध्या महाविकास आघाडीचा 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्यूला समोर आला आहे. मात्र हा फॉर्म्यूला अंतिम नाही, असे काँग्रेसने आज स्पष्ट केले आहे. आम्ही साधारण 100 जागांवर निवडणूक लढवणार आहोत, असे काँग्रेसने सांगितले असून. लवकरच नवीन फॉर्म्यूला समोर येईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार