कर्नाटकात कुटुंबात एकाच महिलेला गृहलक्ष्मी योजनेचा लाभ, मंत्र्यांचा व्हिडीओ ट्विट करत चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर हल्ला
काँग्रेसच्या महालक्ष्मी योजनेवर चित्रा वाघ यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. त्यांनी या योजनेतून घराघरात वादविवाद आणि स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा केलाय.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंड होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, या निवडणुकीत लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही प्रचाराच्या केंद्रस्थानी आहे. सत्ताधारी याच योजनेचा वारंवार उल्लेख करून महिला मतदारांना आकर्षित करत आहेत. तर काँग्रेसनेही महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिन्याला 3000 रुपये देण्याचं आश्वासन दिलंय. मात्र काँग्रेसच्या याच योजनेवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. काँग्रेस सत्तेत आली तर कुटुंबात फक्त एकाच महिलेला लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केलाय.
एकीलाच लाभ द्यायचा अन्...
चित्रा वाघ यांनी एक्सच्या माध्यमातून महालक्ष्मी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना (लाडकी बहिण योजनेसारखी) आहे. यात एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ दिला जातोय. म्हणजेच सासू, सून आणि नणंद यापैकी एकीलाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमधे वाद-विवाद व स्पर्धा निर्माण करायची ही काँग्रेसची योजना आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
लक्षात घ्या माझ्या लाडक्या बहीणींनो...
तसेच, माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो कांग्रेस सत्तेत आल्यास कुटुंबात एकालाच लाभ मिळेल हे लक्षात घ्या. आपल्याकडे महाराष्ट्रात आपले महायुतीचे सरकार एकाच घरात 3 महिला असतील तरी सर्वांना पैसे देत आहे. लक्षात घ्या माझ्या लाडक्या बहीणींनो आणि आपल्या महायुतीलाच निवडून द्या, असं आवाहनही चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांना केलं आहे.
कर्नाटक मधील काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री स्वतः कबूल करतात की कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना (लाडकी बहिण योजने सारखी) यात कॅांग्रेस एका ‘कुटुंबातील फक्त एकाच महिलेला’ लाभ देतयं
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 18, 2024
म्हणजे सासू,सून आणि नणंद पैकी एकालाच लाभ द्यायचा आणि कुटुंबातील महिलांमधे वाद विवाद व स्पर्धा… pic.twitter.com/OORYWBU1My
लाडकी बहीण योजनेवरून राजकारण
दरम्यान, सत्ताधारी महायुतीतील घटकपक्ष राज्यभरात प्रचार करताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत आहेत. आम्ही महिलांना महिन्याला 1500 रुपये देत आहोत. आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर ही रक्कम आम्ही 2100 रुपयांपर्यंत वाढवू, दावा हे सत्ताधारी करत आहेत. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही फसवी आहे. महिलांना प्रलोभित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही सत्तेत आल्यास महिलांना आम्ही महिन्याला 3000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत देऊ, असा दावा विरोधक करत आहेत.
हेही वाचा :