Samarjeetsinh Ghatge Net Worth : वडिलोपार्जित जमीन 115 कोटींवर; समरजितसिंह घाटगेंची संपत्ती कितीशे कोटींच्या घरात ?
समरजित यांच्या पत्नी निवेदिता घाटगे यांच्याकडे 9 कोटी 6 लाख 41 हजार रुपयांची संपत्ती आहे. समरजित घाटगे यांच्या नावावर 14 लाख 58 हजार रुपयांच कर्ज आहे.
Samarjeetsinh Ghatge Net Worth : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल विधानसभेमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजित घाटगे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे. कागलमध्ये जरी अपक्ष आणि मनसेनं उमेदवार दिला असला, तरी समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्येच होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणखी त्वेषाने झाडल्या जातील, यामध्ये काही शंका नाही.
समरजित यांच्याकडे 159 कोटी 89 लाख 9 हजार रुपयांची संपत्ती
कागल विधानसभा मतदारसंघातील (Samarjeetsinh Ghatge Net Worth) उमेदवार समरजित घाटगे यांनी 159 कोटी 89 लाख 9 हजार रुपयांची संपत्ती असल्याचं निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. समरजित यांच्या पत्नी निवेदिता घाटगे यांच्याकडे 9 कोटी 6 लाख 41 हजार रुपयांची संपत्ती आहे. समरजित घाटगे यांच्या नावावर 14 लाख 58 हजार रुपयांच कर्ज आहे. त्यांच्या पत्नीवर 32 लाख 18 हजार रुपयांचं कर्ज आहे. रोख रक्कम, ठेवी, शेअर्स, दागिने, शेतजमीन, इमारती इत्यादी मालमत्तेचा समावेश आहे. समरजित यांच्याकडे एक लाख 58 हजार रुपये रोख आणि चार कोटी एक लाख 48 रुपये हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विविध कंपन्यांचे 61 लाख रुपयांचे शेअर्स आणि 35 लाखांची वाहने त्यांच्या नावावर आहेत. समरजित घाटगे यांच्या वडिलोपार्जित जमिनीची किंमत 115 कोटी आणि पत्नीकडे सहा कोटींची जमीन आहे.
मी उपमुख्यमंत्री होऊ शकतो, हसन मुश्रीफांचा दावा
दरम्यान, कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी मी उपमुख्यमंत्री होऊ शकतं, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, राज्यात आमची पुन्हा सत्ता आली तर मला मंत्रिपद मिळेल. मी मुख्यमंत्री नाही पण झालो तर उपमुख्यमंत्री होऊ शकतो. काही राज्यात दोन, तीन उपमुख्यमंत्री होऊ शकतात मग आपल्याकडे का होऊ शकत नाहीत. पण काही लोकांचे गावात ग्रामपंचायत सदस्य नाहीत त्यांना मत देऊन फुकट घालवू नका, असा टोला त्यांनी समजरजित यांना लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या