Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी धक्का देणार? विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर NCP नेत्याचा दावा
Maharashtra Politics : विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ कमी झालेय.
Maharashtra Politics : विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं विधान परिषदेतील संख्याबळ कमी झालेय. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संख्याबळ आता सारखे झालेय. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केलाय. राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांनी आज याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय अमोल मिटकरी यांनीही एकनाथ खडसे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, असे म्हटलेय. त्यामुळे राष्ट्रवादी विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? अशी चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आज विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. एकनाथ खडसे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजे अमोल मिटकरी यांनी मागणी केली. शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एक ने कमी झाली, आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, असे अमोल मिटकरी म्हणाले. विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार आहोत, असे नरहरी झिरवाळ यांनीही वक्तव्य केलेय. अमोल मिटकरी आणि नरहरी झिरवाळ यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलेय.
विधानपरिषदेची गणितं कशी बदलली?
आधी विप्लव बजौरिया आणि मग मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 9 झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील 9 आहे. सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादीने दावा केला तर त्यांचं पद जाऊ शकतं. एकीकडे अजित पवार हे विधासभेचे विरोधी पक्षनेते आहेत, म्हणजेच हे पद राष्ट्रवादीकडे आहे, त्यात आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने दावा केला तर ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.
शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. त्यापैकी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. तर विरोधी पक्षनेतेपदही ठाकरे गटाकडेच आहेत. सध्या ठाकरे गटाकडे 9 राष्ट्रवादीकडे 9 आणि काँग्रेसकडे 8 जागा आहेत. विधानपरिषदेत पाच अपक्ष आमदार आहेत. त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला आहे तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं संख्याबळ 10 होतं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं संख्याबळ 9-9 असं बरोबरीत येतं. दराडेंनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो.
विधानपरिषदेतील संख्याबळ
(मनिषा कायंदे शिंदे गटात आल्यानंतरचं चित्र)
भाजप : 22
ठाकरे गट : 09
शिवसेना : 02
राष्ट्रवादी काँग्रेस : 09
काँग्रेस : 08
अपक्ष इतर : 07
रिक्त जागा : 21