धुवांधार विकेंड! शनिवारी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर रविवारी राज गर्जना, मुख्यमंत्री दोन दिवस गुवाहाटीत
शनिवारी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार तर रविवारी राज गर्जना होणार आहे. शनिवार-रविवार मुख्यमंत्री शिंदे गुवाहाटीतील कामाख्या देवीचं मंदिर गाठणार आहेत. त्यामुळे हा विकेंड नक्कीच धुवांधार होणार आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणातील सुपर विकेंड पुढील दोन दिवसात अनुभावाला मिळणार आहे. निमित्त आहे ठाकरे बंधूंच्या सभांचं आणि मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याचं. राज्यात ठिकठिकाणी थंडीमुळे तापमानाचा पारा घसरला आहे, पण दोन दिवसातील राजकीय घडामोडी आणि टोलेबाजीमुळे राजकारणातील पारा चढलेला पाहायला मिळेल. त्यामुळे हा विकेंड धुवांधार होणार, यात शंकाच नाही.
शनिवारी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर रविवारी राज गर्जना होणार आहे. त्याशिवाय शनिवार-रविवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदरांसह गुवाहाटीतील कामाख्या देवीचं मंदिर गाठणार आहेत. त्यामुळे हा विकेंड नक्कीच धुवांधार होणार आहे. या विकेंडला राजकीय वार, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत.
विकेंडची सुरुवात होईल ती उद्धव ठाकरेंच्या बुलढाणा दौऱ्यानं... एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या याच दौऱ्यात बुलढाण्यातील चिखलीत जाणार आहेत. तिथं ते शेतकरी मेळावाही घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे. याच जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विदर्भात आपला झेंडा कायम राखण्यासाठी ठाकरेंच्या याच दौऱ्याला विशेष महत्वं येतं. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे. त्यामुळे यांच्याविरोधात ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष लागलंय. त्याशिवाय राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरे येथील सभेतून महाराष्ट्र बंदची हाक देणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलेय.
जिथं शनिवारची संध्याकाळी उद्धव ठाकरेंची सभा असेल तिथं रविवारची संध्याकाळ राज ठाकरेंच्य़ा सभेनं हिट होणार आहे. कारण, सहा महिन्यानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. 27 नोव्हेंबरला मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. आणि या मेळाव्यात पुन्हा एकदा राज गर्जना होईल. काऱण, राज्यातलं सध्याचं वातावरण, त्याचच टिझर मनसेनं लाँन्च केलंय.
महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पर्याय द्यायला तयार आहे...! pic.twitter.com/BrFADsrEHN
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 25, 2022
विकेंडमध्ये ठाकरे ब्रदर्स जितके अॅक्टिव्ह आहेत. तितक्याच अॅक्टिव्ह मोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आहेत. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं. तिथं जेव्हा त्यांच्या राज्यवापसीची वेळ आली. तेव्हा त्यांनी तिथल्या कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. सोबतीला सगळेच आमदारही होते. आणि तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटी चांगलेच चर्चात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालेय.
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात महिलांच्या अवमानावरुन रणकंदन झालंय. विरोधकांच्या अटकेवरुन रान उठलंय. अंधेरीच्या निवडणुकीने ठाकरेंना बळ मिळालंय.
दिवाळीमध्ये राज-शिंदे-फडणवीस एकत्र आले. चित्रपटांच्या वादावरुन राजकारण हाऊसफुल्ल झालंय. सीमावादामुळे त्याला आणखी फोडणी मिळाली. इतिहासातल्या थडग्यांवरुन राजकारण्यांनी एकमेकांच्या कबरी खोदल्या. आणि राज्यपालांच्या वादग्रस्त विधानांनी राजकारणाचा कळस गाठलाय. या आणि अशा अनेक घटनांचा समाचार या तीन इव्हेंटमध्ये घेतला जाणार आहे.