Malegaon Outer Vidhan Sabha Election Result 2024 : मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसेंचा सलग पाचव्यांदा विजय, हिरे घराण्याला पुन्हा धक्का
Malegaon Outer Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांना 1,21,252 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे डॉ. तुषार रामकृष्ण शेवाळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु असून मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाची (Malegaon Outer Assembly Constituency) जोरदार चर्चा रंगली. कारण या मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार दादा भुसे (Dada Bhuse) हे सलग पाचव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले. मात्र यंदा दादा भुसे यांना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे (Adway Hiray) यांचे तगडे आव्हान होते. भुसे-हिरे या लढतीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे राज्यभराचे लक्ष लागले होते. मात्र, दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजय मिळवला.
मालेगाव बाह्य मतदार संघातून मंत्री दादा भुसे हे विजयी झाले आहे. त्यांनी 1 लाख 6 हजार 606 मतांनी प्रमोद बच्छाव आणि अद्वय हिरेंचा पराभव केला.
दादा भुसे, शिवसेना शिंदे गट - 158284
प्रमोद ( बंडूकाका ) बच्छाव, अपक्ष - 51678
अद्वय हिरे, शिवसेना ठाकरे गट - 39834
2004 साली दादा भुसे पहिल्यांदा मालेगाव बाह्य मतदारसंघातून विजयी झाले होते. तर 2009 साली त्यांनी प्रशांत हिरे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत प्रशांत हिरेंना 65 हजार 73 मतं मिळाली होती. तर दादा भुसेंना 95 हजार 137 मतं मिळाली होती. 2009 सालापासून या मतदारसंघावर दादा भुसेंचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे 82,093 मते मिळवून विजयी झाले. भाजपचे पवन ठाकरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर 37,421 मते इतके होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांना 1,21,252 मते मिळवून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे डॉ. तुषार रामकृष्ण शेवाळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
मालेगाव बाह्यमध्ये तिरंगी लढत
शिवसेनेचा फुटीनंतर दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ निवडली. आता एकनाथ शिंदे यांच्याकडून दादा भुसे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. दादा भुसे हे सलग पाचव्यांदा निवडणूक लढवली. मात्र यंदा ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांनी दादा भुसे यांना तगडे आव्हान निर्माण केले होते. तर किरण मगरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे मालेगाव बाह्य मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती.
हिरे घराण्याच्या वर्चस्वाला दादा भुसेंचा धक्का
दरम्यान, मालेगावात सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरे यांचं वर्चस्व होते. त्यांच्यानंतर त्यांच्या घरातील वारसांनी ही परंपरा कायम राखली. मालेगावमधील हिरे घराण्याच्या या वर्चस्वाला भुसे यांनी धक्का दिला. गेली वीस वर्ष पक्षाचे काम करत असताना सुरुवातीला भुसे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. नंतर मात्र, त्यांनी या पराभवावर मात केली. 2004 मध्ये प्रस्थापित हिरे घराण्याचा त्यांनी पराभव केला. मालेगाव बाह्य मतदारसंघात त्यांनी सलग चारवेळा दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे गेल्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते ग्रामविकास राज्यमंत्री होते, तर ठाकरे सरकारमध्ये त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. आता पुन्हा एकदा दादा भुसे यांनी विजय मिळवला.
आणखी वाचा