एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघ (Mahim Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठामच आहेत.
याबाबत माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले आहे. माहीममधून आमचे गेल्या 3 ते 4 टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहिममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांकडे देखील आम्हाला लक्ष द्यावं लागेल, असे त्यांनी म्हटले. आता मनसेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीकेची पहिली तोफ धडाडली आहे. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघाचा वाद तापल्याचे दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. त्यांनी म्हटलंय की, राज ठाकरे यांचा स्वभाव प्रचंड वेगळा आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदे किंवा महायुतीकडे गेलेलो नाही. मात्र, आम्ही ज्या पद्धतीने लोकसभेला पाठिंबा दिला त्याची परतफेड म्हणून तरी या लोकांनी विचार करायला हवा होता. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संकुचित विचारांचे आहे हे यावरून सिद्ध होते, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
महापालिकेची दुटप्पी भूमिका
मनसेकडून दिपोत्सवात मनसेचे चिन्ह आणि नाव असलेले भगवे कंदील लावण्यात आले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिपोत्सवात कंदील लावून मनसे अप्रत्यक्ष प्रचार करित असल्याचा आरोप शिवसेना उबाठाकडून करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने याची दखल घेतल्यानंतर मनसेने आता दिपोत्सवातील कंदील हटवले. याबाबत विचारले असता यशवंत किल्लेदार म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाची कंदील लावण्यासाठी वेगळी परवानगी घेतली होती. या गोष्टी आम्ही विना परवानगी केलेल्या नाहीत. एकीकडे महापालिका परवानगी देते आणि दुसरीकडे महापालिकाच कंदील काढते अशी दुटप्पी भूमिका महापालिकेने घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा