Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Jayant Patil : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचार सभेसाठी जयंत पाटील नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केल्या जात आहेत. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. मात्र जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर राहुल ढिकले यांच्या विरोधात शरद पवार गटाने मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. गणेश गीते यांच्या प्रचारासाठी आज नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नोट प्रेस युनियनने मोठा निर्णय घेतला. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांना नोट प्रेस युनियनने पाठींबा जाहीर केला आहे. या मतदारसंघातून कामगार नेते जगदीश गोडसे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांनी तिकीट मिळाले नसल्याने गोडसे नाराज झाले होते. मात्र आता त्यांची नाराजी दूर झाली असून गणेश गीते यांना कामगार युनियनने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीतेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
2019 सालच्या निवडणुकीत राहुल ढिकलेंचा विजय
2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत निर्मिती झालेल्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वात पहिले मनसेने आपला झेंडा फडकावला होता. उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवित ४७ हजार ९२४ मते प्राप्त करून विजय संपादित केला होता. 2014 मध्ये मोदी लाट उसळल्याने उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले. उमेदवाराच्या भाऊगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप तब्बल 78 हजार 554 मते मिळवून विजयी झाले. शिवसेनेचे चंद्रकांत लवटे दुसऱ्या तर काँग्रेसचे उद्धव निमसे तिसऱ्या स्थानी होते. मनसेचे उमेदवार रमेश धोंगडे यांना अवघी 12 हजार 437 मतं मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र भाजपचे उमेदवार अॅड. राहुल ढिकले यांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांचा 12 हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अॅड. राहुल ढिकले यांना 85 हजार 232 मते मिळाली, तर बाळासाहेब सानप यांना 74 हजार 304 मते मिळाली. या निवडणुकीतून नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा ढिकले घराण्यातून आमदार निवडून आला होता.
आणखी वाचा