Umesh Patil : यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
Umesh Patil : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो मंजूर करण्यात आलेला नाही. उमेश पाटील यांचं राजीनामापत्र समोर आलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ता या पदाचा राजीनामा उमेश पाटील यांनी एक महिन्यापूर्वी दिला होता. अद्याप तो राजीनामा मंजूर करण्यात नसल्याची माहिती आहे. राजीनामा पत्रात उमेश पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात येत असलेला दुजाभाव यावर बोट ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं.
उमेश पाटील यांच्याकडून पक्ष नेतृत्त्वाला प्रश्न
महिनाभरापूर्वी उमेश पाटील यांनी दिलेला राजीनामा अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारला नाही. मात्र, उमेश पाटील यांचं राजीनामा पत्र समोर आलं आहे. पाटील यांनी त्या पत्रातून पक्षनेतृत्त्वाला विविध प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळतं. राजन पाटील यांच्या सारख्या महिलांवर अतिशय खालच्या पातळीत बोलणाऱ्या व्यक्तीला पक्षात ठेवलं कसं असा सवाल देखील उमेश पाटील यांनी उपस्थित केला.
यशवंत माने, रामराजे नाईक निंबाळकर, नरहरी झिरवाळ, बबन शिंदे यांनी पक्ष शिस्त मोडली मात्र त्यांच्यावर कारवाई नाही मात्र माझ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याचा उल्लेख उमेश पाटील यांनी केला आहे.
बड्या नेत्यांनी पक्षशिस्त मोडल्याचा दावा
उमेश पाटील यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाची प्रकरणं मांडली आहेत. यामध्ये मोहोळचे आमदार यशवंत माने सुप्रिया ताईं सोबत गाडीत बसून जाणं, राजन पाटलांनी महायुतीचा खासदार पाडल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटलांचा घरी आणून सत्कार करणं, रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघडपणे तुतरीचा प्रचार करणं, नरहरी झिरवाळ यांचा मुलगा जयंत पाटलांना भेटायला जाणं, आमदार बबनदादा शिंदे पवार साहेबांना भेटायला गेले, अशी उदाहरणं उमेश पाटील यांनी दिली आहेत.
राजन पाटलांनी मागच्या महिन्यात त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या जाहिरातीमध्ये अजित पवार आणि सुनील तटकरेंचा फोटो न टाकता रोहित पवार व रोहित पाटील यांचे फोटो टाकल्याचा उल्लेख देखील उमेश पाटील यांनी केला. आमदार यशवंत माने यांनी तुतारीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करून विकास कामांची उद्घाटने केली . शेकडो पक्ष शिस्त मोडल्याची उदाहरणे देता येतील, असं उमेश पाटील म्हणाले. हे सर्व प्रस्थापित मातब्बर नेते असल्याने कदाचित थोडीफार पक्ष शिस्त मोडण्याची त्यांना सवलत असेल. सामान्य कुटुंबातील माझ्या सारख्या विस्थापित कार्यकर्त्यांना कदाचित ही सवलत नसेल, हे मी समजू शकतो, असंही उमेश पाटील यांनी पत्रातून म्हटलं.
राजन पाटील यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला देत उमेश पाटील यांनी सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला आहे. आपण शिवरायांच्या राजधानीचे खासदार असताना अशी महिलांची व माता भगिनींची विटंबना करण्याची निर्लज्ज वक्तव्य करून त्याचा अभिमान बाळगत असल्याची वक्तव्यं करणाऱ्या राजन पाटलांवर पक्ष शिस्तीची कारवाई का केली गेली नाही ? असा सवाल उमेश पाटील यांनी केला.
इतर बातम्या :
अजित पवारांचा प्रवक्ता शरद पवारांच्या कारमध्ये; रोहित पवार संतापले, म्हणाले उमेश पाटलांना आमचा विरोध