मनसेच्या दीपोत्सवाचा खर्च अमित ठाकरेंच्या निवडणूक खर्चात टाका, आचारसंहिता भंगाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून तक्रार
Shivsena UBT Complaint : मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमातून आचारसंहितेचं उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी मनसेच्या दीपोत्सवाला नियमबाह्य परवानगी देत आचारसंहिता भंग करण्यात आल्याची तक्रार केली आहे. याशिवाय दीपोत्सव कार्यक्रमाला माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित राहिल्यानं त्या कार्यक्रमाचा सर्व खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात ग्राह्य धरण्यात यावा, अशी तक्रार अनिल देसाईंनी केली आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सचिव अनिल देसाई यांच्याकडे तक्रार दिली आहे.
छत्रपती शिवाजी पार्क,दादर येथे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पक्षाच्या बॅनरखाली दीपोत्सव साजरा करायला बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या नियमबाह्य परवानगी बाबत देखील तक्रार करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील कार्यक्रमस्थळी मनसेचे स्थानिक माहीम विधानसभेचे उमेदवार अमित राज ठाकरे हे उपस्थित राहिल्याने सदर कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा या मागण्यांसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची खासदार अनिल देसाई यांनी भेट घेत निवेदन सादर केलं.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या तक्रारीत काय?
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून 'दीपोत्सव' साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट व कंदिल लावण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे, अशी तक्रार नियमांचा दाखला देत ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आली आहे.
दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी स्थानिक माहीम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविल्याप्रमाणे ही आयोगाचे पत्र क्र.437/6/ओआर/95/एमसीएस/1158, दिनांक 29 मार्च, 1996 तसेच आयोगाचा आदेश क्र.437/6/इएस/0025/94/एमसीएस, दिनांक 21 ऑक्टोबर, 1994 (अनुदेशांचे सारसंग्रह, 2004मधील बाब क्र. 133 प्रमाणे पुनरूध्द्धृत केलेले) या नियमानुसार उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याचं म्हणत संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीम विधानसभा उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.
आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देण्याचा महापालिका अधिकारी आणि इतर संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी यावर भारत निवडणूक आयोगाने कडक कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
मनसेचा दीपोत्सव :
इतर बातम्या :
ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी वाढली; परभणीतही एकाच नावाचे तीन उमेदवार