ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी वाढली; परभणीतही एकाच नावाचे तीन उमेदवार
विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या एकूण 25 उमेदवारांसाठीच्या अर्जांपैकी 34 अर्ज वैध ठरली आहेत.
परभणी: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. यंदाच्या राजकीय युद्धातही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून अशाच काही क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. त्यामध्ये, कधी चिन्ह तर कधी नाम साधर्म्यचा आधार घेतला जातो. सद्यस्थितीतही राज्यातील काही मतदारसंघात नामसाधर्म्य पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, परभणी मतदारसंघात शिवसेना युबीटी (Shivsena UBT) पक्षाच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. कारण, येथील मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. परभणीच्या गंगाखेड (Parbhani) विधानसभा मतदारसंघात एकाच नावाच्या 3 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्यासाठी हे उमेदवार धोकादायक ठरू शकतात.
विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या एकूण 25 उमेदवारांसाठीच्या अर्जांपैकी 34 अर्ज वैध ठरली आहेत. या अर्जांमध्ये विशाल विजयराव कदम हे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, तर विशाल बबनराव कदम आणि विशाल बालाजीराव कदम या दोन जणांकडून अपक्ष अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन शिवसेनेचे विशाल कदम यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्या येत आहे. त्यामुळे आता यातील कोण उमेदवारी मागं घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, तसेच नाम साधर्म्य असलेले हे उमेदवार अर्ज माघारी घेणार की लढणार हे चित्र 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
राज्यातील इतर जिल्ह्यातही नामसाधर्म्य अर्ज
राज्यातील इतरही मतदारसंघात अशाच प्रकारे नामसाधर्म असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या व अपक्ष उमेदवाराच्या नावासारखे नाव असलेल्या उमेदवारांंनी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातही अशीच चलाखी करण्यात आली आहे. तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित आर आर पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या माजी खासदार संजय पाटील आहेत. मात्र, रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एक नाव असलेले चार रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. मात्र, रोहित रावसाहेब पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे.