Patan Assembly Election : पाटणमधून निवडणूक लढण्याचं कारण सांगितलं, अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले...
Patan Assembly Election 2024 : पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढ होत आहे. साताऱ्यातील चर्चेत असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील शरद पवारांचे कट्टर समर्थक सत्यजित पाटणकर यांनी पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाटणकर आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. यात शक्ती प्रदर्शना मधून आपली ताकद दाखवण्याचं काम पाटणकर यांनी केलं. त्यामुळं दरवेळी दुरंगी होणार पाटणची लढत आता तिरंगी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर विरूद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई अशी लढत होणार होती. मात्र, ही जागा शरद पवारांकडून घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिली. सत्यजितसिंह पाटणकरांनी आज अपक्ष फॉर्म भरला आहे. या शक्ती प्रदर्शनातील रॅलीतील कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडे हे सर्व पक्षीय असल्याचे दिसत होते. फॉर्म भरल्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवत असल्याचं कारण सांगितलं.
सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याचं कारण सांगितलं. जनतेच्या साक्षीनं विधानसभेसाठी अर्ज भरलाय, जिंकण्यासाठी अर्ज भरला आहे, असं ते म्हणाले. पाटणची जनता स्वाभिमानी जनता आहे.तो स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी अर्ज भरलाय, असं पाटणकर यांनी सांगितलं.
पाटणमध्ये तिरंगी लढत
पाटण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शंभूराज देसाई, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हर्षद कदम आणि सत्यजितसिंह पाटणकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. सत्यजितसिंह पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं.
साताऱ्यातील महाविकास आघाडीचे 8 उमेदवार ठरले
सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील सर्व उमदेवारांच्या नावांची घोषणा झालेली आहे. पाटणला हर्षद कदम, कराड दक्षिणला पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरला बाळासाहेब पाटील, सातारा विधानसभा मतदारसंघात अमित कदम, वाई विधानसभा मतदारसंघात अरुणादेवी पिसाळ, फलटणला दीपक चव्हाण, कोरेगावला शशिकांत शिंदे आणि माणला प्रभाकर घार्गे विधानसभेच्या रिंगणात आहेत.
साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार :
सातारा - शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप) पाटण- शंभूराज देसाई (शिवसेना) कराड दक्षिण - अतुल भोसले,कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजप), फलटण- सचिन पाटील कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), कोरेगाव- महेश शिंदे (शिवसेना) माण- जयकुमार गोरे (भाजप) , वाई- मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
इतर बातम्या :