(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माढ्यासह सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघात नेत्यांची डोकेदुखी वाढली; बंडखोरांच्या अर्जाने धुमाकूळ
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात.
सोलापूर : जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती (mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. मात्र, इच्छुकांना पक्षाकडून संधी न मिळाल्याने अनेकांनी थेट नाराजी दर्शवत अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे, बहुतांश मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळत असून नेते मंडळी बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढत आहे. मात्र, अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले नाहीत. तर, विधानसभेसाठी (Election) 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 5 मतदारसंघातील उमेदवारी व बंडखोरीची माहिती जाणून घेता येईल. त्यामध्ये, पंढरपूर-मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला मतदारसंघाचा आढावा आपण घेऊयात.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ
येथे महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. मात्र, शरद पवार गटाने अनिल सावंत यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, या मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने आता येथील निर्णय हा शरद पवार हेच घेणार आहेत. ज्याची उमेदवारी आघाडी जाहीर करेल तोच अधिकृत उमेदवार रिंगणात असेल. दरम्यान, येथून विद्यमान आमदार समाधान अवताडे हे महायुतीचे उमेदवार आहेत.
माढा विधानसभा मतदारसंघ
माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे शिवाजीराजे कांबळे यांनी बंडखोरी केली असून त्यांना समजावण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघ
सांगोला विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून शेकापणे माढ्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर उद्धव ठाकरे गटाने दीपक साळुंखे पाटील यांच्या हाती मशाल दिली आहे. संजय राऊत यांनी आजच, शिवसेना सांगोल्यातून माघार घेणार नाही हे आधीच जाहीर केल्याने येथे महाविकास आघाडीतील दोन उमेदवार हे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासमोर लढतील, असंच दिसत आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघ
करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीत दोन उमेदवार झाले असून महायुतीला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने दिग्विजय बागल या सर्वात लहान उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. दरम्यान, येथे शरद पवारांनी नारायण पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली आहे.
माळशिरस राखीव मतदारसंघ
माळशिरसमध्ये महायुतीला पाठिंबा देणाऱ्या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून येथे विद्यमान आमदार राम सातपुते व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांच्यात लढत होत आहे.
हेही वाचा
Manoj jarange: त्रास दिला त्याला पाडून बदला घ्यायचा; मनोज जरांगेंचा बीडमधून पहिला उमेदवार रिंगणात