अमित शाह यांना भेटलोय, 4 दिवसात सोयाबीनला तुम्हाला हवा तसा भाव मिळेल, भाजपच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
सोयाबीनला भाव (Soybean Price) कमी आहे म्हणून, तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे. पण येत्या 4 दिवसात तुम्हाला पाहिजे तसा सोयाबीनला भाव मिळेल असे मत भाजप नेते पाशा पटेल (Pasha Patel) यांनी व्यक्त केलं.
Soybean Price : सोयाबीनला भाव (Soybean Price) कमी आहे म्हणून, तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे. भाव कमी झाला म्हणून मी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटलो आहे. येत्या 4 दिवसात तुम्हाला पाहिजे तसा सोयाबीनला भाव मिळेल असं वक्तव्य भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी केलं. ते परंडा इथं आयोजीत करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेत बोलत होते. त्यांच्या या घोषणेमुळं मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढीची मोठी आशा आहे.
तानाजी सावंत हे जादूगार : मुख्यमंत्री
परांडा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेत बोलताना पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या दराबाबत आश्वासन दिलं आहे. भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करतो, तानाजीराव तुमच्या प्रेमापोटी हे लोक आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ही तानाजी सावंत यांच्या विजयाची सभा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली आहे, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही. तानाजीराव जादूगार आहेत. ते जादू करतात असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी एकदा काय दहा वेळा जेलमध्ये जायला तयार
आचारसंहिता लागेल हे आम्हाला माहीत होत. म्हणून ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरचे पैसे टाकल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ज्यांचे पैसे आले नाहीत, त्यांचेही पैसे येणार. हा शब्द देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. एकनाथ शिंदे आंदोलन, संघर्ष करून पुढे आला आहे. शेतकऱ्यांसाठी एकदा काय दहा वेळा जेलमध्ये जायला तयार असल्याचे ते म्हणाले. माझ्या लाडक्या बहिणीला लखपती झालेलं पाहायचं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही याची, तजवीज केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या शेतीचं बिल आपण माफ केलं आहे, आता सर्वांना एकूण बिलच्या 30 टक्के सवलत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा फक्त ट्रेलर आहे असंही ते म्हणाले. निर्णय घ्यायला वाघाचे काळीज लागतं. लांडग्याला वाघाचे कातडे पांघरुन वाघ होता येत नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. उजनीच पाणी कौडगाव इथं पडायला पाहिजे, ते होईल. तानाजीराव तुमचं काम बोलतंय. मतदार संघाचा 35 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: