पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ | विद्यमान आमदार मोनिका राजळेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे या दोनही तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न असून प्रत्येक निवडणुकीत यावर बोलले जाते.
अहमदनगर : पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही मतदारसंघ 2009 पर्यंत वेगवेगळे होते. मात्र हे दोनही मतदार संघ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होते. 2004 साली झालेल्या निवडणुकीत शेवगाव मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नरेंद्र घुले तर पाथर्डी मतदारसंघातून राजीव राजळे हे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2009 साली मतदारसंघात बदल होऊन पाथर्डी आणि शेवगाव हे दोन मतदारसंघ एकत्र झाले. त्यामुळे 2009 साली राष्ट्रवादीकडून माजी आमदार नरेंद्र घुले यांचे बंधू चंद्रशेखर घुले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि निवडून आले.
2014 साली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु होण्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानभूती मिळाल्याने 2014 साली भाजपच्या तिकीटावर उभ्या असलेल्या मोनिका राजळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
गेली अनेक वर्षे भाजपमध्ये असलेल्या प्रताप धाकाने यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र पक्षाने ढाकणे यांना उमेदवारी न देता त्यावेळेचे विद्यमान आमदार चंद्रशेखर यांना तिकीट मिळाले. त्यातच पाच वर्षे राष्ट्रवाडीकडून योग्य वागणूक न मिळाल्याचा आरोप करत येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले, तर वेगळ्या मार्गाने निवडणुकीत उतरण्याचा इशारा प्रताप धाकाने यांनी दिलाय.
2014 साली झालेल्या निवडणुकीत भाजप लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या सहनुभूतीमुळे मोनिका राजळे यांचा विजय झाला. मात्र भाजपमध्येच दोन गट झाल्याने आणि सुजय विखे यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याने मोनिका राजळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. तर दुसरीकडे चंद्रशेखर घुले यांनीही कंबर कसलीये. त्यामुळे या निवडणुकीत पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात त्रिशंकू लढत होण्याची शक्यता आहे.
विशेष बाब म्हणजे पाथर्डी आणि शेवगाव मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदान जास्त प्रमाणात आहे. शिवाय भाजपमध्ये 2 गट निर्माण झाल्याने वंजारी समाजाने स्वतंत्र संघटना स्थापन केलीये. त्यामुळे हा समाज कोणाच्या पारड्यात आपले मतदान टाकणार हे देखील तितकेच महत्वाचे आहे.
पाथर्डी-शेवगाव मतदार संघातील समस्या
पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त आहेत. त्यामुळे या दोनही तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न असून प्रत्येक निवडणुकीत यावर बोलले जाते. मात्र अद्यापही ही समस्या सुटलेली नाही. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा पाथर्डी तालुक्यातून जातो. चार वर्षापूर्वी या रस्त्याचे काम सुरु झाले. अहमदनगरपासून कल्याणपर्यंत या रोडचे काम जवळपास पूर्ण झाले. मात्र पाथर्डी तालुक्यात आणि पाथर्डी ते अहमदनगर या रोडचे काम रखडले आहे. अर्धवट कामामुळे अनेक अपघात झाले. त्यामुळे रस्त्याची समस्या 4 वर्षांपासून नागरिकांना भेडसावत आहे.
विधानसभा 2014 मतदानाची आकडेवारी
- मोनिका राजळे (भाजप) - 1,34,685
- चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी) - 81,500
- अजय रक्ताटे (काँग्रेस) - 1941